पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही कारवाई नाही

भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधातील अनेक बंडखोरांना शांत करण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना यश आले असले, तरी भाजपचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघात मात्र शिवसेना बंडखोर उमेदवाराला शिवसेनेचे बळ मिळत असल्याचे चित्र आहे. शहरातील अन्य मतदार संघातील शिवसेना बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असला तरी कसब्यातील बंडखोरावर शिवसेनेकडूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

विधानसभा निवडणुकीत शहरातील आठही विधानसभा मतदार संघांत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी जागा वाटपात शिवसेनेला ठेंगा दाखविण्यात आल्यानंतर शिवसैनिकांत नाराजी निर्माण झाली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नाराज गटाची बैठक झाली. या बैठकीत शहरातील किमान दोन मतदार संघ भाजपकडून घ्यावेत, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडे करण्यात आली. मात्र ती पूर्ण होत नाही हे लक्षात येताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करण्यात आली. वडगांव शेरीमधून माजी गटनेता संजय भोसले, खडकवासल्यातून जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून नगरसेविका पल्लवी जावळे, कसब्यातून नगरसेवक विशाल धनवडे, हडपसरमधून गंगाधर बधे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केले.

या बंडखोरांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खडसाविल्यानंतर यातील धनवडे वगळता अन्य बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र धनवडे यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश धुडकावून प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचाराला शिवसेनेच्या नाराज गटाचे बळ मिळत असल्याचे दिसूत आहे. कसबा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार, विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात त्यांचा जोरात प्रचार सुरू आहे. दरम्यान, या बंडखोरीची आणि प्रचाराची स्थानिक नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे, असा दावा करण्यात आला आहे. मात्र बंडखोर उमेदवाराला पक्षाकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्यामुळे पक्षाचेच या उमेदवाराला अभय आहे, अशी चर्चा शिवसैनिकांत आहे.

निवडणुकीसाठी महायुतीकडून अधिकृत उमेदवार देण्यात आले आहेत. त्या उमेदवारांचाच प्रचार करण्याबाबत शिवसैनिकांना सांगण्यात आले आहे. या संदर्भात खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील नाराजांची समजूत काढण्यात आली. बंडखोरी करणाऱ्यांना यापूर्वी समज देण्यात आली आहे. शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.  -बाळा कदम, पुणे शहर संपर्क प्रमुख, शिवसेना