|| अविनाश कवठेकर

शिवाजीनगरमध्ये भाजप एकसंध; काँग्रेसपुढे आव्हान

शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला छुपा सत्तासंघर्ष तसेच पक्षांतर्गत वाद तूर्तास शमले आहेत. शिवाजीनगरमध्ये भाजप, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी भाजप-काँग्रेसमध्ये सरळ लढत आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग ही भाजपसाठीची जमेची बाजू आहे. त्यामुळे काँग्रेसपुढील आव्हान खडतर ठरण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळविण्यासाठी शिवाजीनगर मतदारसंघात सुरू असलेला छुपा सत्तासंघर्ष उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच आणखी तीव्र झाला होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद आणि नाराज गटाची खदखद उफाळून आल्यामुळे भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे आव्हानात्मक ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज गटाची समजूत काढण्यात यश आले आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय चित्रही बदलले आहे. शिवाजीनगर मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे येथे विस्तारले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतही सर्वच्या सर्व बारा प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही, हीच बाब या मतदारसंघातील भाजपची ताकद स्पष्ट करणारी आहे. त्यात आता अंतर्गत वाद मिटल्यामुळे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाजप उमेदवाराला साथ मिळत असल्यामुळे काँग्रेसच्या तुलनेत भाजपचे पारडे वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार या मतदारसंघात मोठय़ा संख्येत आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले असले, तरी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक यंत्रणेचे काम महत्त्वाचे ठरले होते, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगत त्यावर दावा करण्यात आला होता. मात्र अजित पवार यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला दिला जाईल, असे सांगितल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

सन २००४ मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय तडजोडीतून हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला होता, असेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांण्यात आले. काँग्रेसकडून दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना या मतदारसंघातून मिळालेली मते लक्षात घेता काँग्रेसला विजयासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीचा फटकाही काँग्रेसला बसले, अशी चर्चा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुहास निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मनसेचा घटता जनाधार लक्षात घेता मतदारसंघातील ही लढत दुरंगी होईल, असे दिसत आहे.