१२५ दखलपात्र तक्रारींचे निराकरण
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता भंगबाबत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २१ मतदारसंघातून निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल अॅपवर १४२ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी १२५ तक्रारी दखलपात्र असून, त्यांचे निराकरण करण्यात आले आहे, तर सोळा तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सी-व्हिजिल अॅपवर येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून ५७ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी वडगाव शेरी मतदारसंघातून सर्वाधिक सतरा तक्रारी आल्या आहेत. त्याखालोखाल कसबा पेठ मतदारसंघातून १५ तक्रारी आल्या आहेत, तर सर्वात कमी तक्रारी पर्वती आणि हडपसर मतदारसंघातून आल्या आहेत.
या मतदारसंघातून प्रत्येकी एक तक्रार आली आहे. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. ग्रामीम भागातील दहा मतदारसंघांपैकी आंबेगाव मतदारसंघातून सर्वाधिक २६ तक्रारी आल्या आहेत.
त्यापैकी २१ तक्रारींची दखल घेण्यात आली असून कार्यवाही सुरू आहे, तर पाच तक्रारींवर सी-व्हिजिल अॅप कक्षातील अधिकाऱ्यांमार्फत तातडीने निराकरण करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघातील भोसरी मतदारसंघातून १२, पिंपरीमधून १३ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून ‘लोकसत्ता’ला देण्यात आली.
तक्रारींनंतर फलक झाकले
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरासह जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या नावासह लावलेले फलक झाकण्यात आले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून झाकलेले फलक उघडे पडले आहेत. त्यावरील आच्छादने उडून गेली आहेत. याबाबत सी-व्हिजिल अॅपवर अधिक तक्रारी आल्या आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही करत फलक पुन्हा झाकण्यात आले आहेत.