विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्यापासून शहरातील विविध घटकांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे. घरोघरी प्रचार पत्रके वितरित करणे, सभेला गर्दी करणे यासाठी महिलांना तसेच तरुणांना काम मिळाले आहे. याशिवाय मतदार संघात प्रचारासाठी रिक्षा आणि छोटी चारचाकी लागत असून ही वाहने ज्यांच्याकडे आहेत, त्या वाहन चालकांनाही काम मिळाले आहे. निवडणुकीमुळे हॉटेल व्यावसायिकांचा धंदाही वाढला आहे. तसेच मतदान केंद्रावर मतदारांचे नाव आणि क्रमांक असलेल्या चिठ्ठय़ा देण्यासाठी सुशिक्षित तरुणांना काम दिले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी, चिंचवड आणि पिंपरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या तीन मतदार संघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक मतदार संघात उमेदवारांच्या प्रचार पत्रकांचे वाटप सुरू झाले आहे.

प्रचारपत्रके वाटप करण्याचे काम बहुतांश उमेदवारांनी महिलांना दिले आहे. ज्या उमेदवारांची प्रचार पत्रके वाटपासाठी दिली जातात, त्या उमेदवाराच्या पक्षाचे उपरणे गळ्यात घालून महिला घरोघरी प्रचार पत्रकाचे वितरण करतात. याशिवाय राज्यस्तरीय नेत्यांच्या सभेला गर्दी दिसावी यासाठी रोजंदारीवरील लोकांची गर्दी केली जाते. एका सभेसाठी तीनशे ते पाचशे रुपये दिले जात आहेत. शिवाय चहा, नाश्त्याचाही व्यवस्था केली जाते आहे. काही उमेदवार जेवणाची व्यवस्था करत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खाणावळ, हॉटेल चालकांचा व्यवसाय वाढला आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता पाण्याचीही व्यवस्था केली जाते. पाण्याच्या बाटल्या घाऊक पद्धतीने खरेदी करून त्या बाटल्या सभेत आलेल्या नागरिकांना वाटल्या जातात. पाण्याच्या बाटल्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही सध्या चांगला व्यवसाय मिळत आहे.

प्रचारपत्रके तसेच जाहीरनाम्याची छपाई उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात करण्यात आली असल्यामुळे छपाई व्यावसायिकांचा व्यवसायही प्रचाराच्या काळात वाढला आहे. ध्वनिवर्धक लावून मतदार संघात फिरण्यासाठी रिक्षा तसेच चारचाकी वाहनांची मोठय़ा प्रमाणात गरज भासते. त्यामुळे या वाहन चालकांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. बहुतांश उमेदवारांनी मतदार संघात प्रचारासाठी रिक्षाचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे.

मतदानाच्या दिवशी मतदाराचे नाव असलेली चिठ्ठी देण्यासाठीही रोजंदारीवर सुशिक्षित तरुणांना काम दिले जाणार आहे. एका मतदाराची चिठ्ठी देण्यासाठी उमेदवाराकडून दोन रुपये दिले जातात. प्रत्येक मतदार संघात चारशेपेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. त्यामुळे तीनही मतदार संघांत मिळून दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून छपाई व्यवसाय वाढला आहे. उमेदवारांचे जाहीरनामे शिवाय प्रचार पत्रकांच्या छपाईची कामे वाढल्यामुळे या निवडणुकीमध्ये चांगला व्यवसाय होत आहे.- विवेक गड्डाम, मुद्रण व्यावसायिक