पिंपरी : अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली-चऱ्होलीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या नियोजनाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. अंधारात ठेवून ही योजना लादली जात असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सोमवारी या योजनेच्या जाहीर प्रकटन कागदपत्रांची होळी केली.कुदळवाडी, चिखली आणि जाधववाडी परिसरामध्ये अनधिकृत पत्राशेड, भंगार गोदामे, लघुउद्योग उभारले होते. भंगार व्यावसायिकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या भागात बांगलादेशी, रोहिंगे असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेने ८२५ एकर क्षेत्रफळावरील अनधिकृत भंगार गोदामे, दुकानांवर कारवाई करण्यात आली. आता महापालिकेने चिखली, कुदळवाडी, चऱ्होलीत नगररचना योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. चिखलीमधील ३८० हेक्टर, चऱ्हाेलीतील एक हजार ४२५ हेक्टरवर आराखडा तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, या योजनेच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, योजनेला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी कुदळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक झाली. त्यामध्ये जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, बाळासाहेब यादव, उदय पाटील, दिलीप यादव, रमेश मोरे, दत्तू मोरे, शैलेश मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून योजनेच्या जाहीर प्रकटनाची होळी करण्यात आली.
चिखली, कुदळवाडीच्या जमिनी तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या. महापालिकेच्या आरक्षणातही मोठे क्षेत्रफळ गेले आहे. घरकुलासाठी शंभर एकर क्षेत्र घेतले. यापूर्वीच या भागातील रस्त्यांसाठी देखील जमीन संपादित करण्यात आली. आता नगररचना योजनेसाठी पुन्हा एकदा स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रशासनाच्या हालचाली असल्याचे दिनेश यादव म्हणाले.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली आणि चऱ्होलीसाठी नगररचना योजना जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या योजनेला विरोध आहे. भूमिपुत्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता प्रशासन अशी योजना राबवू शकत नाही.या योजनेला तत्काळ स्थगिती देण्यात यावी.- महेश लांडगे, आमदार, भोसरी