शिरूर : शिरूरमधील कोळगाव डोळस या गावातील शाळेसाठी शिक्षकांची नेमणूक न झाल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले. ग्रामस्थांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. शिक्षक उपलब्ध करून मिळेपर्यंत शाळा सुरू करू न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.या गावातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याने त्याचे शिक्षण विभागाने निलंबन केले आहे. यामुळे एकच शिक्षक चार वर्गांना शिकवत आहेत.
ग्रामस्थांनी मागणी करूनही शिक्षण विभागाने नवीन शिक्षकांची नेमणूक केली नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शाळेत एकच शिक्षक आहेत. शाळेत ५० पेक्षा अधिक पटसंख्या आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नेमणूक न झाल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले. यावेळी उपसरपंच सिद्धार्थ डोळस, विलास जगताप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप, माजी सरपंच सोमनाथ सूर्यवंशी, सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष बाबू गोरे, नारायण शेडगे, प्रकाश वाळुंज, संभाजी कुल, आबासाहेब नागवडे, यशवंत पडवळ, प्रकाश पडवळ, अर्जुन सूर्यवंशी, प्रमोद धामोरे, शंकर कोळपे, उमेश सूर्यवंशी, बाळासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.दरम्यान, शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू असून, लवकरच कोळगाव डोळस शाळेस शिक्षक देण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले.