विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण; संशोधनासाठीचा निधी वाढवण्याची घोषणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पीएचडीचे प्रबंध आणि संशोधनाबाबत फक्त टीका करून थांबणार नसून संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे संशोधनासाठीचा निधीही वाढवण्यात येणार आहे,’ अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.

विज्ञान भारती, महाराष्ट्र शासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या ‘भारतीय विज्ञान संमेलन’च्या उद्घाटन प्रसंगी तावडे बोलत होते.

राज्यातील पीएच.डी बोगस असल्याची टीका तावडे यांनी बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमात केली होती. त्याचा संदर्भ घेऊन तावडे म्हणाले, ‘संशोधनाचा दर्जा आणि पीएच.डीच्या पदव्यांबाबत नुसतीच टीका करून मी थांबणार नाही. संशोधनाचा दर्जा वाढवण्यासाठी तंत्रज्ञान, निधी यांबाबत खासगी कंपन्यांचेही सहकार्य यापुढे घेण्यात येईल. नव्या विद्यापीठ कायद्यात स्वतंत्र संशोधन मंडळ स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे. प्रबंध कॉपी-पेस्ट असू नयेत यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांचे काटेकोरपणे पालन विद्यापीठांनी करणे गरजेचे आहे. तशा सूचना संशोधन केंद्रांना देण्यात आल्या आहेत. संशोधनासाठी ६ टक्के निधीची तरतूद केली पाहिजे मात्र प्रत्यक्षात ०.२१ टक्के इतकाच निधी संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. येत्या दोन वर्षांत संशोधनासाठीचा निधी ४ ते ५ टक्कय़ांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.’

शाळांच्या शुल्कवाढीने संतापलेल्या पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी पुन्हा एकदा घेराव घातला. तावडे यांनी प्रसारमाध्यमांसमोरच पालकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत असा आग्रह पालकांनी धरला.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde comment on fake phd and phd professor
First published on: 13-05-2017 at 02:14 IST