महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही. वरकरणी वेगवेगळे असले तरी आतून सर्वाचा मिळून ‘एकच पक्ष’ आहे. गोपीनाथ मुंडे दुपारी भगवानगडावरून शरद पवार यांच्यावर टीका करतात, त्याच संध्याकाळी नितीन गडकरी पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि दोघे एकमेकांचे गोडवे गातात, अशी उपहासात्मक टीका सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केली.
पिंपळे निलखच्या राजीव गांधी प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेत ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, मारुती भापकर, पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे, प्रा. नामदेव जाधव आदी व्यासपीठावर होते. चौधरी म्हणाले, की प्रामाणिक माणसे कोणालाच नको असतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ आणि बिल्डरशाहीच्या विरोधात लढणारे आहेत. मात्र, त्यांचीही कोंडी होते. पवारांच्या फाईली अडल्या म्हणून त्यांना धोरणलकवा दिसू लागला. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा मुख्यमंत्री विरोधकांनाही नको आहे. भाषेच्या, अस्मितेच्या नावाखाली उद्धव-राज ठाकरे राजकारण करतात. सुबुद्धी असेल तर त्यांनी हुकूमशाही करू नये. अन्यथा जनता रस्त्यावर येईल.
असुरक्षितता, भ्रष्टाचार आणि असंतुलित विकास या कारणांमुळे जनता त्रस्त आहे. त्यांना भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे आहे. राजकीय पक्ष व नेत्यांमध्ये बदल होणे पुरेसे नाही, तर व्यवस्थाच बदलली पाहिजे, तंत्रज्ञानात प्रगती हवी, निवडणूक कार्यक्रमात सुधारणा तसेच सर्वच क्षेत्रांत विकेंद्रीकरण हवे. वेगवेगळय़ा पक्षांतील २० प्रमुख नेते आणि देशभरातील २० बलाढय़ उद्योगपती अशा ४० जणांच्या हातात देशाचा कारभार एकवटला आहे. ते देशाची माती करत असून, आपल्या पुढील अनेक पिढय़ा बरबाद करण्याचे काम ते करत आहेत, अशी टीका चौधरी यांनी केली. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. संग्राम जगताप यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
‘महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही’
महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही. वरकरणी वेगवेगळे असले तरी आतून सर्वाचा मिळून ‘एकच पक्ष’ आहे. अशी उपहासात्मक टीका सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केली.

First published on: 03-01-2014 at 02:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwambhar choudhari opposite party congress ncp bjp shiv sena mns