विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द

शहराच्या विकासाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा प्रत्येक भागाचे वेगळेपण मनामध्ये ठसते. त्या त्या परिसरावर ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय वैशिष्टय़ांचा कमी-अधिक प्रभाव जाणवतो. खेडय़ामधले घर कौलारू हरवून, टोलेजंग इमारती उभ्या राहतात. वाडवडील कष्टात आणि दारिद्रय़ात रमले, पिचले. पण नवीन पिढी मात्र शिक्षणामुळे विकासाचे मुक्त वारे अनुभवतेय. हे आणि असे सर्वकाही विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द भागात अनुभवास येते.

पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेल्या पर्वतीच्या डोंगररांगेची सोबत करत एक रस्ता सिंहगडाकडे जातो. पेशवाईत पुण्याची नैर्ऋत्येची हद्द जेमतेम भिकारदास मारुतीपर्यंतच होती. पुढील सर्व परिसर हा हिरव्यागार वनश्रीचा होता. पर्वती तळ्याच्या पश्चिमेकडून वाटेतला आंबिल ओढा ओलांडून एक वाट सिंहगडाकडे जाणारी होती. मुठा नदीच्या किनाऱ्याने हिंगणे खुर्द व बुद्रुक, वडगाव खुर्द व बुद्रुक,  नांदेड, धायरी, शिवणे, कोपरे, किरकिटवाडी अशा गावांचे अस्तित्व शिवकालापासून आहे. हिंगणे खुर्द भागात नदीकाठी पेशवाईकाळात विट्ठल मंदिर उभारले गेले. भव्य दगडी बांधकाम आणि रेखीवपणामुळे या परिसराला विठ्ठलवाडी संबोधले जाऊ लागले. हिंगणे खुर्द गावात शिवकाळात पंचवीसेक उंबऱ्यांच्या वस्तीची नोंद आढळते. विठ्ठल मंदिराच्या परिसरात अशीच छोटी वस्ती होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सिंहगड वाटेवर थेट खडकवासलापर्यंत अशीच विखुरलेल्या वाडय़ांची वस्ती होती. प्रस्तुत लेखांत विठ्ठलवाडी आणि हिंगणे खुर्द परिसराचा आढावा घेणार आहे. सद्य:स्थितीत हा परिसर राजाराम पूल ते माणिकबागेपर्यंत, सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा विस्तारित  झाला आहे. सुमारे आठशे एकराचे क्षेत्र आणि लाखाची वस्ती या परिसरात आहे.

इतिहासातून वर्तमानात येताना काही पाऊलखुणांपाशी निश्चितच मन रेंगाळते. सिंहगड वाटेवर थेट धायरीच्या पुढेपर्यंत अरुंद रस्ता, दाट झाडी, मुख्यत्वे वड आणि आंब्याची होती. विठ्ठलवाडी मंदिराचा परिसर, निसर्गरम्य असल्याने सांगत्ये ऐका, कच्चे धागे अशा अनेक चित्रपटांचे शूटिंग याच परिसरात झाले. चित्रकारांचे मुख्य आकर्षण म्हणजे नदीकाठ आणि मंदिर परिसर! एके काळी पुणेकरांचे हे सहलीचे ठिकाण होते. सूर्यास्तानंतर या भागातून किर्र झाडी आणि अंधारलेला रस्ता यामुळे चिटपाखरुपण नसे. ही स्थिती अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत होती. वाटमारीचे तुरळक प्रकारही त्या काळात अनुभवलेले पुणेकर आजही हयात आहेत. ऐंशीच्या दशकापर्यंत, याच परिसरात आठशेपेक्षा अधिक छोटे उद्योग एखाद्या मशिनरीच्या आधारे चालू होते. विठ्ठलवाडीची पारंपरिक जत्रा म्हणजे आबालवृद्धांचे विरंगुळ्याचे ठिकाण होते. विठ्ठलवाडी म्हणजे पुण्याची पंढरी मानली जात होती. ही श्रद्धा खूप काही सांगून जाते. सारे काही बदलत आहे म्हणजे अंधार फार झाला, अशी नकारात्मक हाकाटी नसून प्रभात किरणेसुद्धा वाटेवर आहेत, असा हा परिवर्तनाचा काळ आहे. लांब पल्ल्याचा फ्लायओव्हर आणि नदीकाठचा रस्ता मार्गी लागला, तर या परिसराच्या विकासाला आणखी गती येणार आहे. पूर्वी सूर्यास्तानंतर निर्मनुष्य असलेल्या या रस्त्यावर एखाद्या बैलगाडीचाच खडखडाट होता. आता कोणत्याही वेळी मिनिटागणिक शेकडो वाहने या रस्त्यावर गतिमान असतात. वस्ती आता लाखाच्या पुढे पोहोचली आहे.

परिसराच्या विकासाची कारणे शोधताना या परिसराच्या प्रशासकीय कारकीर्दीचा वेध घेणे उपयुक्त ठरते. विठ्ठलवाडी मंदिर आणि हिंगणे खुर्द गावठाण या परिसरात मिळून तीस-चाळीस उंबऱ्यांची ही वस्ती होती. पर्वती, धनकवडी, हिंगणे, वडगाव आणि आंबेगाव हा परिसर पाचगाव म्हणूनच ओळखला जात होता. ऊसशेती आणि गवताची कुरणे हाच येथील भूमिपुत्रांचा मूळ व्यवसाय होता. पाचगावची पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती. १९७६ मध्ये हिंगणे खुर्दची स्वतंत्र पंचायत झाली आणि विकासाला गती आली. १९९७ मध्ये ही गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली आणि नागरी सुविधांबरोबर गावपण हरवू लागले. परिसरात पूर्वी आठशेपेक्षा अधिक छोटे उद्योग, बडय़ा कंपन्यांना पूरक असे व्यवसाय करीत होते. औद्योगिक क्षेत्रातील तेजी-मंदीची झळ त्यांनीसुद्धा अनुभवली. तरीही स्थानिकांना रोजगाराबरोबर स्थिरस्थावर करण्याचे काम या उद्योगांनी निश्चितच केले. सह्य़ाद्री डायस्टफ अ‍ॅण्ड केमिकल्स या उद्योगाचा उल्लेख इथे अपरिहार्य ठरतो. पानशेतच्या पुरानंतर पुणे चौफेर विस्तारले. पर्वती, कोथरूड, धनकवडी, येरवडापाठोपाठ नागरी वस्ती वाढण्यासाठी याच परिसरात लक्ष वेधले गेले. पुलोद सरकारच्या काळात १९७८ च्या सुमारास भूमिहीन शेतमजुरांसाठी महादेवनगर येथे ६१ घरे वसवली गेली. या भागात १९८० साली पोस्ट ऑफिस सुरू झाले. पानशेत पुरानंतर याच भागात पंपिंग स्टेशन उभारून शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. विजयसिंह मोहिते पाटलांच्या मंत्रिपदाच्या काळात (२००० साल) या परिसरातील भव्य, रुंद रस्त्याचे काम मार्गी लागले.

गावातील मूळ घराणी जगताप आणि चावट यांची. विठ्ठलभक्तीमुळे संभाजी चावट यांचे गोसावी हे नामकरण झाल्याचे समजले. परमभक्तीने दृष्टांत होऊन त्यांना शेतात विठ्ठल मूर्ती मिळाल्याची वदंता रूढ आहे. त्यांनी बांधलेल्या छोटेखानी मंदिराला पुढे पेशव्यांचा राजाश्रय लाभून मंदिरास भव्य रूप प्राप्त झाले. या व्यतिरिक्त गावात फडके गणपती, रोकडोबा, लक्ष्मीआई आणि महादेवाचे मंदिर आहे. रामनवमी, कृष्णजन्म, आषाढी, कार्तिकी एकादशी असे मुख्य उत्सव आजही संपन्न होतात. शिक्षणसंस्थांचा विचार करता गोसावी विद्यालय ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम, मिशनरी मंडळींचे झेवियर केंद्र आणि बी.एड., डी.एड. अध्यापन महाविद्यालये अशा मोजक्या संस्था आहेत.

लोकवस्तीचा विचार करताना ४० टक्के कष्टकरी समाज, ४० टक्के कनिष्ठ मध्यमवर्गीय सुशिक्षित समाज, ५ टक्के व्यापारी मंडळी आणि उर्वरित परप्रांतीय, इतर धर्मीय असे वर्गीकरण समजले. वरद, महालक्ष्मी, नंदादीप, धनलक्ष्मी, आनंदनगर या सोसायटय़ा सत्तरनंतर विकसित झाल्या. बहात्तरच्या दुष्काळानंतर मराठवाडा भागातील अनेक शेतमजूर या परिसरात आले. त्यांच्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासकीय योजना माध्यमातून राजीव गांधीनगर (भटके  कलाकार), खोराड वस्ती (धनगर), रामनगर (लमाण), महादेवनगर (शेतमजूर) यांच्यासाठी वस्त्या उभ्या राहिल्या. धुळे, गुलबर्गा, वालचंदनगर, कोकण, पुसद या भागातील अशी सर्वच मंडळी या परिसरात स्थायिक झाली आहेत. आपापल्या मुला-नातवंडांना शाळेत घेऊन जाताना वस्तीमधील फेरफटक्यात अशी मंडळी पाहून शिक्षणाने उजळणारी प्रकाशवाट स्पष्टपणे जाणवत होती.

हिंगणे खुर्द गावाने पूर्वी आदर्श गाव, आदर्श सरपंच असे राष्ट्रीय पातळीवरील सन्मान मिळवले आहेत. चौसष्ट लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक हा या पंचायतीचा विक्रम होता. देशभरातून अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रवासी या गावाला भेट देण्यासाठी येत असत. सरपंचांच्या राष्ट्रीय परिषदेचे खास निमंत्रण पंतप्रधान नरसिंहराव यांनी पाठविल्याची माहिती गावक ऱ्यांनी दिली. आरोग्य जागृतीचे कार्य पाहून कुसुमाग्रजांनी या गावाला भेट देऊन (१९८९) अपवादात्मक सन्मान स्वीकारला होता. नामवंत साहित्यिक भा. रा. भागवत, वसंत काणे, भा. द. खेर, मामा देशपांडे (माउली आश्रम) यांची निवासस्थाने याच परिसरात आहेत. विकास वाटेवरून प्रवास करताना या गावात पूर्वी (१९७० च्या सुमारास) प्रती चौरस फूट केवळ एक रुपया दर असलेल्या या गावाने आता सहा हजार रुपयांपुढे मजल मारली आहे.

गावाचा विकास आणि प्रतिष्ठित मंडळींची नावे, त्यांचे योगदान विचारात घेता अपरिहार्य ठरतात. बुजुर्गापैकी नारायण जगताप, रामभाऊ गोसावी, धुळा खताळ, संभाजी गोसावी, ज्ञानोबा निवंगुणे, दिगंबर गोसावी, शांताराम जगताप ही नावे महत्त्वाची आहेत. सद्य:स्थितीत सदाशिव लाळे, कुमार गोसावी, पांडुरंग जगताप, बबनराव दौंडकर, मधुशेठ गोसावी, रत्नाकर जगताप, घनश्याम जगताप, आबा जगताप, प्रकाश हिंगणेकर, राजेंद्र जगताप यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, मंजूषा नागपुरे सर्वज्ञात आहेत. डॉ. हिरेन निरगुडकर म्हणजे या गावाच्या  माहितीचा आणि लोकसेवेचा चालताबोलता कोष आहेत. व्यवहारापलिकडे जाऊन सेवाभावनेने कार्यरत असलेल्या या भल्या माणसाचा छोटेखानी दवाखाना खूप काही सांगून जातो. उत्सव मंडळांपैकी एकता, जनजागृती, अखिल हिंगणे खुर्द, समस्त महादेवनगर ही मंडळे आणि कार्यकर्ते आपापल्या परीने ग्रामविकासात सहभागी आहेत.

लोकवस्तीचा विचार करता पुरेशा शिक्षण संस्थांची उणीव या परिसरात जाणवते. बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक समस्या वारंवार उद्भवताहेत. नदीकाठच्या रस्त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे असताना आता फ्लायओव्हर मार्गी लागत आहे. नदी प्रदूषणाची सार्वत्रिक समस्या या भागातही आहे. सुमारे चारशे गृहरचना संस्था (सोसायटी) या परिसरात आहेत. कचऱ्याची विल्हेवाट सक्षमतेने अजूनही पूर्णाशाने होत नाही, असे भ्रमंतीमध्ये समजले. मात्र नवे रहिवासी आणि मूळ गावकरी यांच्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सामंजस्य, बंधूभाव इथे प्रत्ययास येतो, हे लक्षणीय वाटते.

विठ्ठलवाडीची उजळणी करताना मंदिराच्या वैशिष्टय़ाची दखल घ्यायला हवीच! संभाजीबुवांचे विठ्ठल मंदिर म्हणून या देवस्थानाची पूर्वापार ओळख आहे. या मंदिरात गाभाऱ्याच्या भिंतीवर असलेल्या सनदपत्रातून मंदिराचे बांधकाम १७३२ पूर्वी झाले असावे असा निष्कर्ष निघतो. या मंदिराजवळच नदीपात्राकाठी पुंडलिकाचे उंच शिखर असलेले मंदिर आहे. चंद्रकोरीप्रमाणे नदीपात्र, दाट झाडी आणि देखणी मंदिर शिल्पे यामुळे अजूनही हा परिसर कलासक्त रसिक मनाला आणि भाविकांना आकर्षित करतो हे नि:संशय. विठ्ठलवाडीचे मंदिर देखणे आहे. ओवऱ्या असलेली तटबंदी, सभामंडप व गाभारा, सर्व काम दगडी असून पूर्व पेशवाई वास्तुशैलीशी जवळीक दाखवते. नाना फडणविसांनी पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी नऱ्हे आंबेगावजवळून खापरी नळ आणले. ते याच परिसरात या रस्त्यावर विटांच्या बांधकामांचे मनोरे होते, ज्यांना इंग्रजांनी लाइन टॉवर संबोधले होते. असे शेवटचे बांधकामसुद्धा अलीकडच्या रस्तारुंदीत पाडले गेले.

विठ्ठलवाडीचा कायापालट होऊ लागला तो साधारणपणे १९७० नंतरच. तुरळक बांधकाम आणि छोटय़ा कारखान्यांनी हा परिसर गजबजून गेला. ओनरशिप फ्लॅट्सच्या इमारतींची दाटी, थेट वडगाव धायरीपर्यंत पोहोचली. हिरवे अरण्य संपुष्टात येऊन काँक्रीटचे अरण्य प्रस्थापित झाले. अगदी मंदिराला खेटूनच इमारती उभ्या राहिल्या आणि हमरस्त्यावरून होणारे मंदिराचे दर्शनसुद्धा दुर्लभ झाले. नैमित्तिक जत्रा अजूनही भरतात, परंतु नदीच्या पात्रात पाय सोडून बसण्याचा निवांतपणा आता मुळीच नाही.

शहरे विस्तारतात, गावे सामावली जातात, भौतिक सुखसोयी वाढतात, विज्ञान- तंत्रज्ञान घरादारात पोहोचते, पण गावकीचा आणि भावकीचा तो जिव्हाळा आता कुठे शोधायचा, हाच सवाल मनामनामध्ये रुखरुख ठेवतो. सूर्योदय आणि सूर्यास्त तेच आहेत, पण..!

या लेखनासाठी माजी सरपंच रत्नाकर जगताप, डॉ. हिरेन निरगुडकर, मुंगळे मास्तर, इतिहास संदर्भ डॉ. अविनाश सोवनी, विकासासंदर्भात माजी आमदार कुमार गोसावी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.