पुणे : वायव्य भारतात अद्यापही उष्णतेची लाट कायम असून, तेथे तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने विदर्भात १८ ते २० एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही कमाल तापमानाचा पारा सध्याच्या तुलनेत काहीसा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या दक्षिण आणि पूर्वोत्तर भागांत पावसाळी वातावरण असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांत १९ एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायव्येकडील राज्यांत उन्हाच्या लाटांचा कहर सुरूच आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या भागातील कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. राजस्थानसह, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या हिमालयीन विभागातही तापमान वाढणार आहे. या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेशानंतर विदर्भातही १८ एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

देशात एकीकडे तापमानात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वोत्तर भागांमध्ये काही ठिकाणी सध्या पाऊसही होत आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेशपर्यंत पावसाळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १९, २० एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

चंद्रपूर ४४ अंशांवर

विदर्भात तापमान पुन्हा वाढू लागले आहे. चंद्रपूर येथे शनिवारी राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. वर्धा, ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर येथील तापमान ४२ ते ४३ अंशांवर आहे. मराठवाडय़ात ४२ अंश, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापूरच्या भागात ते ४० ते ४१ अंशांवर आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागात तापमान सरासरीच्या जवळ आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning heat wave vidarbha rest maharashtra forecast rise ysh
First published on: 17-04-2022 at 00:01 IST