मार्ग बंद असतानाही देखभाल दुरुस्तीसाठी तीस लाखांचा खर्च

पुणे : स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्ग बंद असतानाही केवळ देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली उधळपट्टीचा घाट महापालिकेच्या पथ विभागाने घातला आहे. पुणे विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण होण्यापूर्वी बंद मार्गाची ‘किरकोळ’ देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले आहे. त्यासाठी तीस लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित मेट्रो विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अद्याप मान्य झालेला नसतानाही पथ विभागाने हा घाट घातला आहे.

 पीएमआरडीएच्या प्रस्तावित िहजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे हडपसर-फुरसुंगी पर्यंत विस्तारीकरण केले जाणार आहे. नियोजित विस्तारित मार्ग स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गातून जाणार आहे. िहजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरणाची मागणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पीएमआरडीएने विस्तारित मार्गाचा अहवाल केला आहे. मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाने बीआरटी मार्गात कामे करण्यास नंतर अडथळा नको म्हणून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी तीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

बीआरटी मार्गातील बसथांब्याची दुरुस्ती, दुभाजकांची उभारणी, सायकल मार्गाची दुरुस्ती आणि अनुषंगिक कामे या तीस लाखातून करण्यात येणार आहेत. बीआरटी मार्गाची सुधारणा करणे आणि हा मार्ग सुरू करण्याला महापालिकेचे प्राधान्य आहे. मात्र प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणामुळे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. या मार्गाची दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते, असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

तेरा वर्षांपूर्वी महापालिकेने स्वारगेट ते हडपसर या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी सुरू केली. मात्र अद्यापही बीआरटी मार्ग ‘प्रायोगिक’ अवस्थेतच आहे. सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीला बीआरटी मार्गाचा अडथळा ठरत असल्याने बीआरटी मार्गाची मोडतोड करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवकांनी बीआरटी नकोच, अशी भूमिका घेतल्याने सध्या हा मार्ग बंद झाला आहे. बीआरटी मार्गातून खासगी दुचाकी, चारचाकी गाडय़ा जात असून वाहतुकीला अडथळा होत असल्याने बीआरटी मार्गावेळी विकसित करण्यात आलेले सायकल मार्ग,पदपथ, सेवा रस्ते हटविण्यात आले आहेत. त्यामुळे बीआरटी मार्ग गुंडाळला गेला आहे. मात्र त्यानंतरही केवळ उधळपट्टीसाठी देखभाल दुरुस्तीचे कारण पुढे करण्यात आले आहे. स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गाच्या उभारणीसाठी महापालिकेने तब्बल १२७ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च केला. त्यानंतर बीआरटी मार्गात वेळोवेळी सुधारणा करण्यासाठी आत्तापर्यंत ९० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यामध्ये सायकल मार्ग उभारणे, त्यांची दुरुस्ती, रस्ता रुंदीकरण, पदपथांचे विकसन, सेवा रस्ते, बीआरटी मार्ग रस्त्याच्या मध्ये घेणे अशी कामे करण्यात आली आहेत. मार्ग सुधारणेसाठी वेळोवेळी कोटय़वधी रुपये खर्च करूनही हा मार्ग सुरू होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

बंद मार्गावर कोटय़वधींची उधळपट्टी

मेट्रोच्या कामामुळे नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्ग बंद आहेत. तर नदीकाठच्या खराडी-शिवणे रस्त्याअंतर्गत येत असलेल्या संगमवाडी ते सादलबाब चौक या बीआरटी मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचा घाट महापालिकेने घातला आहे. खराडी-शिवणे रस्त्याचे भूसंपादन झालेले नसतानाही ही कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या सुधारणेसाठीही आत्तापर्यंत शेकडो कोटी खर्च करण्यात आला असून स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेसाठी ७५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा मार्गही मुदतीमध्ये प्रशासनाला सुरू करता आला नव्हता. कामांना अनेकवेळा मुदतवाढ दिल्यानंतर आणि वेळोवेळी खर्च केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी स्वारगेट-कात्रज बीआरटी सेवा सुरू करण्यात आली आहे.