पुणे : पावसाचे प्रमाण यंदा जास्त असल्याने धरणाचा अधिकचा पाणीसाठा न ठेवता नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या अनुषंगाने वस्तुस्थिती तपासून जलसंपदा विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, अडचणींसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ही माहिती डुडी यांनी दिली. जिल्हा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जिल्हा पुनर्वनस अधिकारी स्वप्नी मोरे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे आदेशही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.
पुणे बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने नागरिकंना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, या दृष्टीने २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. मोबदल्याची ही प्रकरणे गतीने निकाली निघतील, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. हवेली, मुळशी, वेल्हा तालुक्यातील दरडग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावे, वस्त्या, पाड्यांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून आवश्यक तेथे पुनर्वसन, अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे डुडी यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचना योजनेमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पाणी गुणवत्ता तपासून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. अतिवृष्टीमुळे कऱ्हा नदीवरी वाहून गेलेल्या ठिकाणी नवीन बंधारे बांधणे, त्यांची दुरुस्ती करणे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल.
बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसंदर्भातील भूसंपादन मोबदल्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशी सूचनाही डुडी यांनी केली. तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील जलप्रदूषण, वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी केली जाईल. भोर तालुक्यातील रस्त्यांचे भूमीसंपादन, मोबदला तसेच रस्त्यांच्या कामांची गती वाढविण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून पर्यटनस्थळांना रस्त्यांच्या जोडणीसह पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहितीही डुडी यांनी दिली.