तरीही शहरात पाणीकपातीचा विचार नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झालेला नाही. पानशेत आणि खडकवासला या दोन धरणांमध्ये मिळून अवघा तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या पंधरा दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, अशी परिस्थिती असूनही पाणीकपातीचा कोणताही विचार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून शनिवारी सांगण्यात आले.

पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडवासला अशा चार धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. टेमघर आणि वरसगाव धरणे दुरुस्तीच्या निमित्ताने या आधीच रिकामी करण्यात आल्याने केवळ पानशेत आणि खडकवासला धरणांवर पुणेकरांची भिस्त आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार दौंड-इंदापूर भागातील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी चालू वर्षांत २४ मार्च ते १७ जून या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

सद्य:स्थितीत धरणांमध्ये केवळ ३.३५ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जून महिन्यात पुण्यात केवळ एकच दिवस ५५ मि.मी. एवढा पाऊ स पडला. जुलैच्या पंधरवडय़ापर्यंत अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणसाखळीत १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. पुण्यात चांगला पाऊ स पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणीकपात करण्याबाबत जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला कोणतेही पत्र दिलेले नाही, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी शनिवारी दिली.

पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच खडकवासला धरणसाखळीत पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणीकपात करण्याचा कोणताही विचार नाही.   – व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महानगरपालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in pune
First published on: 01-07-2018 at 04:36 IST