पुणे : वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १०.९६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत तो किंचितच जास्त आहे.

शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा १०.०९ टीएमसी होता.

शहरासाठी खडकवासला धरण साखळी, पवना आणि भामा-आसखेड या धरणांतून अनुक्रमे ११.६० टीएमसी, ०.३४ टीएमसी आणि २.६७ असे एकूण १४.६१ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. गेल्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली आहे. महापालिकेला मंजूर पाणीसाठ्यापैकी गेल्या वर्षी (२०२३-२४) या कालावधीत खडकवासला धरणातून १८.७२ टीएमसी, पवना धरणातून ०.४२ टीएमसी आणि भामा-आसखेड धरणातून १.८७ टीएमसी असा एकूण २०.९९ टीएमसी पाणीवापर महापालिकेने केला आहे.

फेब्रुवारीअखेरपर्यंत खडकवासला धरणातून १२.०५, पवना धरणातून ०.२६ आणि भामा आसखेड धरणातून १.२३ टीएमसी असा एकूण १३.५५ टीएमसी एवढा पाणीवापर झाला आहे. मंजूर पाणी आरक्षणानुसार महापालिकेला वार्षिक १४.६१ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे. त्यापैकी १३.५५ टीएमसी पाणीवापर झाल्याने उर्वरित १.०६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

मात्र, वाढत्या उन्हामुळे महापालिकेकडून धरणातून जास्त पाणी घेतले जात असून, धरणातील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला केले आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे.

खडकवासला धरण साखळी प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा असला, तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता आणि महापालिकेसाठी राखीव असलेल्या साठ्याचा विचार करता पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. त्यामुळे तशी सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. – श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग