पुणे : पश्चिम घाटातील मातीच्या नमुन्यांतून संशोधकांनी काळ्या बुरशीच्या (ॲस्परजिलस सेक्शन नायग्री) दोन नव्या प्रजाती शोधल्या आहेत. या प्रजातींचे ‘ॲस्परजिलस ढाकेफलकरी’ आणि ‘ॲस्परजिलस पॅट्रिसियाविल्टशारीया’ असे नामकरण करण्यात आले असून, या संशोधनातून पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आला आहे.

आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. राजेश कुमार के. सी., हरिकृष्णन के., डॉ. रवींद्र पाटील यांनी हे संशोधन केले. काळी ॲस्परजिलस बुरशी ही औद्योगिक क्षेत्रात ‘वर्कहॉर्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषतः सिट्रिक ॲसिड उत्पादन, अन्न तंत्रज्ञान, आंबवणी प्रक्रिया आणि शेती अशा क्षेत्रांत त्याचा उपयोग होतो. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी ठरवलेल्या ‘पॉलिफेसिक टॅक्सोनॉमिक ॲप्रोच’ या पद्धतीचा उपयोग या संशोधनासाठी करण्यात आला. या बुरशीच्या सूक्ष्मरचनात्मक वैशिष्ट्यांसोबतच डीएनएतील अनेक जनुकांच्या विश्लेषणातून दोन नव्या प्रजाती समोर आल्या. ‘ॲस्परजिलस ढाकेफलकरी’ ही प्रजाती जलद वाढणारी, फिकट ते गडद तपकिरी बीजाणू, पिवळसर-केशरी स्क्लेरोशिया, गुळगुळीत व लंबवर्तुळाकार बीजाणू असलेली आहे, तर ‘ॲस्परजिलस पॅट्रिसियाविल्टशारीया’ विपुल स्क्लेरोशिया पण बीजाणू कमी, पाचपेक्षा अधिक शाखांत फुटणारे कोनिडियोफोर्स मुकुट आणि काटेरी बीजाणू असलेली आहे.

या संशोधनाचे वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि जैव तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. त्यामुळे पश्चिम घाटाचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या संशोधनातून भारतात पहिल्यांदाच सर्वांत प्रगत एकात्मिक किंवा ‘पॉलिफेसिक’ म्हणजेच बहुचरणीय वर्गीकरण पद्धतीचा वापर करून भारतीय संशोधकांनी ॲस्परजिलस बुरशी प्रजातीचा पहिल्यांदाच शोध लावला आहे.

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैवऊर्जेच्या क्षेत्रात आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर यांचे भरीव वैज्ञानिक योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावावरून या प्रजातीचे नामकरण करण्यात आले.

ॲस्परजिलस वर्गातील बुरशीचा प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात उपयोग होतो. नव्या प्रजातींच्या औद्योगिक क्षेत्रातील वापराबाबत अधिक अभ्यास करण्यात येत आहे. जैवविविधतेने संपन्न पश्चिम घाटातून प्राणी, पक्षी, वनस्पतीच नाही, तर बुरशीसारख्या घटकांच्याही नव्या प्रजाती समोर येत आहेत. त्यामुळे पश्चिम घाटाचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. – डॉ. प्रशांत ढाकेफळकर, संचालक, आघारकर संशोधन संस्था