पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज सध्या पुण्यात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची उलटतपासणी घेण्यासाठी त्यांना सोमवारी (१२ फेब्रुवारी) पाचारण करण्यात आले होते. मात्र, उलटतपासणी दरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे आणि आंबेडकर यांच्यात बाचाबाची झाली आणि रागाने आंबेडकर आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले.
आंबेडकर हे उलटतपासणीसाठी आयोगासमोर सोमवारी आले होते. विशेष सरकारी वकील ॲड. हिरे यांनी त्यांची उलटतपासणी घेण्यास सुरूवात केली. उलटतपासणी दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारी २०१८ रोजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि ३ जानेवारी २०१८ रोजी बंद पुकारला होता. या बंद दरम्यान महाराष्ट्रात बरेच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ॲड. हिरे यांनी आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. बंदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, असे ॲड. हिरे यांनी सांगितले. त्यावर आंबेडकर यांनी आक्षेप घेत हा आयोग १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबाबत स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे ३ जानेवारी २०१८ रोजी राज्यात झालेल्या परिस्थितीवर प्रश्न विचारून सरकारी वकील दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी या वेळी केला. मात्र, आयोग हा हिंसाचार आणि त्याचे परिणाम यासाठी स्थापन करण्यात आल्याचे ॲड. हिरे यांनी सांगत आंबेडकर यांची उलटतपासणी घेण्यास पुन्हा सुरूवात केली. मात्र, आंबेडकर यांनी अधिक काही बोलण्यास नकार देत तेथून बाहेर पडले. त्यामुळे आंबेडकर यांची उलटतपासणी अर्धवट राहिली.
हेही वाचा – मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी वाहतूक ब्लॉक
दरम्यान, माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथील दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला सांगितले की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो.