पुणे : राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलून आता चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षेच्या अभ्यासक्रमासह अन्य तपशील यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून चौथी आणि सातवीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिल्या आहेत.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी या बाबत जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता पाचवी, आठवी ऐवजी आता इयत्ता चौथी, सातवीसाठी आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी, पाचवी, सातवी, आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवी, आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर इयत्ता चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम, अधिसूचना, इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्या अनुषंगाने इयत्ता चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांनी पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची, विद्यार्थी अर्जात (इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांची माहिती भरून संकलित करण्याबाबत शाळांना सूचना देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
शाळांनी माहिती संकलित करून भरलेली प्रपत्रे शाळेतच ठेवावी. जेणेकरून परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर ऑनलाइन अर्जाचा दुवा कार्यान्वित होताच ऑनलाइन अर्ज भरणे सुलभ, जलद आणि बिनचूक होईल. त्या अनुषंगाने शाळांनी कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यासक्रम लवकर जाहीर करावा
इयत्ता चौथी, सातवी या इयत्तांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार आहे. मात्र, आता शाळांचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. शाळेतील नियमित अध्ययन-अध्यापनासह शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यास कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यासक्रम लवकर जाहीर करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
