पुणे : देशभरातील ८२ टक्के शिक्षण संस्था अद्याप नॅक मूल्यांकनाच्या कक्षेत आलेल्या नाहीत. तसेच केवळ ४०० विद्यापीठांनीच नॅक मूल्यांकन केले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत नॅक मूल्यांकनाची नवी कार्यपद्धती जाहीर केली जाणार असून, आता नॅक मूल्यांकन प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२६ व्या पदवीप्रदान कार्यक्रमात डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई या वेळी उपस्थित होते.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, देशात आतापर्यत सी, बी, ए, ए प्लस प्लस अशा श्रेणींद्वारे शिक्षण संस्थांचे मूल्यांकन केले जात होते. मात्र, श्रेणींमुळे शिक्षण संस्थांमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्धा होऊ नये म्हणून आता मूलभूत मूल्यांकन पद्धती लागू करण्यात येणार आहे. देशात ५० हजार महाविद्यालये, १२०० विद्यापीठे आहेत. देशातील जवळपास ८२ टक्के शिक्षण संस्था ‘नॅक’ मूल्यांकनाच्या कक्षेबाहेर आहेत. १२०० विद्यापीठांपैकी केवळ ४० टक्के, म्हणजे ४०० विद्यापीठेच मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळे आता शिक्षण संस्थांसाठी मूल्यांकनाची पद्धती अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच ‘मॅच्युरिटी बेस्ड ग्रेड’ ही पद्धत आणली जाणार आहे. अत्यंत बारकाईने निकष निश्चित करण्यात येत आहेत.

काही वर्षांपूर्वी देशात कोणत्याही विदाशिवाय विद्यापीठे, महाविद्यालयांची क्रमवारी जाहीर व्हायची. मात्र, एनआयआरएफ ही शासकीय क्रमवारी आहे. त्यात विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, अध्ययन निष्पत्ती अशा प्रमुख निकषांवर मूल्यांकन केले जाते. विद्यापीठांनी माजी विद्यार्थी, उद्योग यांच्याशी नियमित संपर्क ठेवला पाहिजे. त्यातून प्रतिमा निर्मिती करणे, प्रतिमा उंचावणे शक्य आहे, असेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रांची स्थापना

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) प्राध्यापक, शिक्षक, विद्यापीठांना विद्यार्थी न येण्याची भीती आहे. मात्र, एआय कितीही विकसित झाले, तरी माणुसकी शिकवण्यासाठी माणूसच लागणार आहे. एआयचा उपयोग शिक्षणात केला पाहिजे. शेती, शाश्वत शहर, आरोग्यनिगा अशा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दृष्टीने आयआयटी, एम्स येथे ‘एआय उत्कृष्टता केंद्र’ करण्यात आली आहेत. आता एआयचा शिक्षणात वापर करण्यासाठीही उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाणार आहे. त्यासाठीही अर्ज मागवण्यात आले होते. लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाणार आहे.