पुणे : वाहनचालकांसाठी परवाना प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी पुण्यातील आळंदी रस्ता येथील फुलेनगर येथे ‘स्वयंचलित वाहनचालक चाचणी’ (ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग टेस्ट – एडीटीटी) प्रणाली आधारित रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावाला परिवहन विभागाकडून मंजुरी मिळाली. स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंपनीला वर्षभरात या प्रणालीचा रस्ता उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. स्वयंचलित प्रणालीमुळे दुचाकीस्वारांना पक्का वाहन परवाना मिळवणे आणखी कठीण होणार आहे.
पुण्यातील दुचाकीचालकांना शिकाऊ वाहन परवाना दिल्यानंतर कायमस्वरुपाचा वाहन चालक परवाना काढण्यासाठी आळंदी रस्त्यावरील फुलेनगर मैदान येथे जावे लागते. या ठिकाणी जुन्या पद्धतीनुसार दुचाकी चालकांना चाचणी द्यावी लागते. या ठिकाणी निकालात मानवी हस्तक्षेप किंवा विलंब झाल्याच्या तक्रारी होत आहे. वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ने हडपसर, आळंदी रस्ता आणि सासवडजवळील दिवे घाट या तीन ठिकाणी स्वयंचलित सेन्सर आधारित प्रणाली सुरू करण्यासाठी परिवहन आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता.
आळंदी येथील प्रस्ताव गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असून या ठिकाणी मोठ्या वाहनांच्या तपासणीसाठी ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ असल्याने जागा अपुरी असल्याचे आणि तांत्रिक कारणे दाखविली जात होती. मात्र, जागेची उपलब्धता आणि वाहनांचे प्रमाण हे निदर्शनास आणून दिल्यानंतर परिवहन विभागाकडून दुचाकीस्वारांच्या चाचणीसाठी आधुनिक प्रणालीचा अंतर्भाव असलेल्या ‘एडीटीटी’ प्रणाली रस्त्याला मंजुरी दिली, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाले, ‘आळंदी रस्ता येथील आरटीओच्या जागेत स्वयंचलित वाहनचालक चाचणी प्रणाली उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ‘आयडीटीआर’ येथील ट्रॅकची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. हा चाचणी रस्ता उभारून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या प्रणालीमुळे परवाना देण्याच्या प्रक्रियेला विलंब किंवा प्रतीक्षा करावी लागणार नाही, पारदर्शकता निर्माण होईल.’
अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
‘चारचाकी किंवा इतर अवजड वाहनांचा पक्का परवाना काढण्यासाठी अर्जदारांना आयडीटीआर येथे जावे लागते. सेन्सर आधारित स्वयंचलित प्रणालीमुळे चाचणी देताना चालकाच्या हालचाली बारकाईने टिपल्या जातात. त्यामुळे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे यामध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नसून, चालक गाडीतून बाहेर पडताक्षणी निकाल दिला जातो. याच पद्धतीचा अवलंब दुचाकीचालकांसाठी होणार आहे,’ असे भोसले यांनी नमूद केले.
फायदे काय
– परवान्यासाठी प्रतीक्षा करणे कमी होणार.
– अधिक पारदर्शक मूल्यांकन
– मानवी हस्तक्षेप करण्यास वाव नाही.
– एक प्रमाणित स्वयंचलित प्रणालीद्वारे काम
– पक्षपात केल्याचे आरोप, मानवी चुका कमी होतील.