New Pune Commissioner Naval Kishor Ram: पुणे शहर महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून IAS अधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ३१ मे रोजी पुण्याचे सध्याचे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांच्यावर पुण्याच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आत्तापर्यंत नवल किशोर राम यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं असून खुद्द पुणे जिल्ह्यातदेखील त्यांनी आव्हानात्मक अशा करोना काळात जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी
याआधी नवल किशोर राम यांनी पंतप्रधान कार्यालयात (PMO) महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. पीएमओमध्ये ते उपसचिव म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्रालयातदेखील त्यांनी महसूल विभागाचे सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
करोना काळात पुणे जिल्ह्यात कार्यरत
नवल किशोर राम यांनी अतिशय आव्हानात्मक अशा करोना काळात पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. २०१८ ते २०२१ या काळात ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी करोना काळात केलेल्या कामगिरीचं व्यापक स्तरावर कौतुक देखील झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय पुण्यातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य या बाबतीत नवल किशोर राम यांनी केलेल्या कामाची दखल वरीष्ठ पातळीवरूनदेखील घेण्यात आली. पुण्यातील कार्यकाळानंतर त्यांची केंद्रात पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली.
नवल किशोर राम मूळचे बिहारचे
दरम्यान, पुण्याचे नवे पालिका आयुक्त मूळचे बिहारच्या पूर्व चंपारणचे रहिवासी आहेत. २००८ साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये त्यांनी एक वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नांदेडमध्ये झाली. त्यानंतर यवतमाळ, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्येदेखील त्यांनी महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर काम केलं आहे.
पुणेकरांना फायदा होणार का?
नवल किशोर राम यांच्याकडे शहर प्रशासनाचा उत्तम अनुभव असून अनेक महत्त्वाच्या सेवांच्या बाबतीत त्यांनी याआधीच्या जिल्हाधिकारीपदाच्या कार्यकाळात केलेली कामगिरी त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध सार्वजनिक सेवा आणि इतर बाबतीत सूसूत्रता व सुधारणा त्यांच्याकडून केल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी नवल किशोर राम यांच्या नियुक्तीचा अध्यादेश जारी केला. राज्याचे सेवा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची या अध्यादेशावर सही असून नवल किशोर राम यांना ३१ मे रोजी राजेंद्र भोसलेंकडून पुणे पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.