पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जात नाही. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी या पोलीस ठाण्यासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. तसेच जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका असेही त्यांनी पोलिसांना आवाहन केले आहे.

कौटुंबिक, मारहाण, विनाकारण त्रास देत असल्याबद्दल पोलीस ठाण्यात गेल्यास सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून दाद दिली जात नाही. तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. त्यांच्याशी सौजन्याने संवाद साधला जात नसल्याच्या अनेक तक्रारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर खासदार बारणे यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी पोलीस ठाण्याबाबतचा नागरिकांनी सांगितलेला कटू अनुभव आयुक्तांच्या कानावर घातला.

हेही वाचा – ज्येष्ठ महिला चोरट्यांचे ‘लक्ष्य’ पर्वती, लोकमान्यनगर भागात दागिने चोरीच्या घटना

खासदार बारणे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांशी काही पोलिसांना काही देणेघेणे नाही असे दिसते. शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गैरप्रकार घडत आहेत. सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन आल्यास त्याची तात्काळ दखल घेतली जात नाही. अनेकवेळा तासंतास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील चुकीच्या कारभाराच्या अनेक तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. हे पोलीस आयुक्तालयाला शोभा देणारे नाही. लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या नागरिकाबाबत फोन केल्यास संबंधित व्यक्तीला नाहक त्रास दिला जातो. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पोलीस अधिकारीच जबाबदार असल्याचे दिसून येते. तक्रारदाराला नाहक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ समज द्यावी.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका

राज्यातील जनतेने प्रचंड बहुमतासह महायुती सरकारवर विश्वास टाकला आहे. महायुतीचे सरकार जनतेचे सरकार आहे. त्यामुळे लोकाभिमुख कारभार झाला पाहिजे. जनतेचा सरकारवरील विश्वास कमी होईल असे वर्तन करू नये अशा सूचना खासदार बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केल्या आहेत.