“महाराष्ट्र काही मागासलेले राज्य नाही. कोणत्याही बाजूने राज्याची सीमा सोडून गेलो तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश या सगळ्या ठिकाणी आपल्याला गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रविवारी केला. “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील.”, असेही त्यांनी सांगितले.
गरिमा या पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रदालनाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.  

मी एकदा मध्यरात्री नितीन गडकरींना केला होता दूरध्वनी –

“मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे, असे मी एकदा मध्यरात्री केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना दूरध्वनी करून सांगितले होते. त्यानंतर घरी आलेल्या गडकरी यांनी ‘माझ्या भाषणात तुमचा उल्लेख केला.” असे सांगितले.  महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतो. त्याबदल्यात आधी राज्यातील रस्ते सुधारायला हवेत, अशी अपेक्षा शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी, असेही त्या म्हणाल्या.

… या दोन्ही युवा नेत्यांना युवकांचे प्रश्न माहिती आहेत –

अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदार युवक असून या दोन्ही युवा नेत्यांना युवकांचे प्रश्न माहिती आहेत. या दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. घरात बसून केवळ गृहिणीपद सांभाळण्यापेक्षा आपल्यातील कलागुण आणि आवड जोपासत महिलांनी उद्योग व्यवसायात यशाचे शिखर गाठावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.