पुणे : राज्यात नवे शैक्षणिक वर्ष आणि पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल रखडला आहे. अंतरिम निकाल एप्रिलमध्ये जाहीर करूनही अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, येत्या आठवड्यात अंंतिम निकाल, गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण परीक्षा परिषदेने दिले.

राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते. यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर २५ एप्रिल रोजी परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या अंतरिम निकालानुसार पाचवीचा २३.९० टक्के, तर आठवीचा १९.३० टक्के निकाल लागला. त्यानंतर दोन महिने उलटूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध कधी होणार, याकडे विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील दहावी, बारावीचे लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. त्या परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर होतो. मग ओएमआर पद्धतीने होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास परीक्षा परिषदेला इतका वेळ का लागतो, असा प्रश्न एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला. अंतरिम निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटून गेल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांना अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे. आधीच शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा सध्यापेक्षा थोडी लवकर घेऊन निकाल एप्रिल-मेमध्ये जाहीर केल्यास त्याचा फायदा शाळांच्या प्रवेशांसाठीही होऊ शकतो, असेही या शिक्षकाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणवत्ता याद्यांतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात अंतिम निकाल आणि गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात येतील.- डॉ. महेश पालकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद