पुणे : पंतप्रधान आवास योजना आणि समान पाणीपुरवठा या दोन योजना नव्या आर्थिक वर्षात पूर्ण होतील. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलमापक बसविणे, पाण्याच्या टाक्यांची उभारणी, जलवाहिन्या टाकणे ही कामे पूर्ण होणार असून जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसुली पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी शुक्रवारी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. समान पाणीपुरवठा योजनेत प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, पंपिंग स्थानके बांधणे, तसेच नागरिकांच्या नळजोडणीवर जलमापक बसविणे अशी कामे प्रस्तावित आहेत. पाण्याच्या साठवण टाक्या बांधणे, मुख्यदाब नलिका टाकणे यांसाठी प्रत्येकी एक, तर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रनिहाय पाच अशी सात निविदांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

हेही वाचा – एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमाचा वाद आता उच्च न्यायालयात; २०२३ पासून अभ्यासक्रम लागू करण्यासाठी याचिका

दरम्यान, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका गृहप्रकल्प उभारत आहे. पाच प्रकल्पांमधून एकूण २९१८ सदनिका उपलब्ध होणार आहेत. महापालिकेतर्फे हडपसर येथे तीन ठिकाणी १०२४, खराडी येथे ७८६ आणि सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीजवळ वडगाव खुर्द येथे ११०८ सदनिका बांधण्यात येत आहेत.

हेही वाचा – Viral Video: पुण्यात पीएमपी चालकाचा असाही प्रताप, बस चालवताना मोबाईलवर बघत होता चित्रपट

नव्या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी जादा तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत समान पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील आर्थिक वर्षात जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसूल केली जाईल. तसेच पंतप्रधान आवास योजनांतर्गत सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will complete the works of pradhan mantri awas yojana in the new financial year says pune mnc commissioner pune print news psg 17 ssb
First published on: 24-03-2023 at 17:47 IST