‘पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती का करता? मराठी भाषेचे नुकसान सहन करणार नाही. लाखो रुपयांचे शुल्क भरून ज्या आंतरराष्ट्रीय बोर्डांमध्ये मुले शिकतात, त्यांना हिंदी, मराठी सक्तीचे करणार का,’ असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी उपस्थित केला.
पुण्यात आल्या असता, सुळे यांनी राज्य सरकारच्या वतीने केली जाणारी हिंदी भाषेची सक्ती, गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात ‘ससून’च्या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली ‘क्लीन चिट’, बीड येथे वकील महिलेला झालेली अमानुष मारहाण, जलजीवन मिशनचे अपयश अशा विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
‘राज्य सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण चुकीचे असून, त्यामुळे मुलांचे प्रचंड नुकसान होईल. शिक्षकांचीही तयारी झालेली नाही. महाराष्ट्र बोर्डाचे काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे,’ असे त्या म्हणाल्या. ‘बीड जिल्ह्यातील वकील महिलेला करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाई करावी,’ अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.
‘ससूनचा अहवाल जाळून टाका’
‘गर्भवतीला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘ससून’च्या चौकशी समितीने दिलेली ‘क्लीन चिट’ ही धक्कादायक बाब आहे. राज्य सरकारकडून रुग्णालयाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘ससून’चा हा अहवाल जाळून टाका,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.