अविनाश कवठेकर, लोकसत्ता

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर संचालक पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली असतानाच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना संधी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून पार्थ यांचा राजकारणात आणण्यासाठीच पवार यांनी राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री आणि वित्त खात्याची जबाबदारी तसेच पक्ष संघटनाची वाढती जबाबदारी यामुळे मिळणारा अपुरा वेळ लक्षात घेऊन अजित पवार यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा बँकेत ते गेल्या ३२ वर्षांपासून प्रतिनिधित्व करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह बाहेर पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या गटाची ताकद वाढविण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निकटवर्तीयापैकी एकाची संचालकपदी वर्णी लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातूनच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचे नाव पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा-‘मेफेड्रोन’ विक्रीचे जाळे देशासह परदेशात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पार्थ यांनी २०१९मधील लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढविली होती. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर पार्थ सक्रिय राजकारणात फारसे दिसून आले नाहीत. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर विविध कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती दिसून येत आहे. पुण्यात झालेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासही पार्थ उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून पार्थ यांना उमेदवारी मिळेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळेच त्यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश बँकेच्या माध्यमातून केला जाईल, अशी चर्चा अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.