लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या खासगी बस रस्त्यांवर थांबत असल्याने होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या बस पीएमपीच्या डेपोत ठरवीक वेळेत थांबण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पुणे महापालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडे (पीएमपीएमएल) पाठविण्यात येणार आहे.

शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या खासगी बस रस्त्यावर थांबतात. त्यामुळे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्यांना पीएमपी डेपोत ठरावीक वेळेत थांबण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आहे. शहरातून विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या खासगी बस सकाळी, सायंकाळी, तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरच थांबलेल्या असतात. त्यामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने हा प्रस्ताव तयार करून पीएमपी प्रशासनाकडे पाठविण्याचे निश्चित केले आहे.

या सर्व खासगी बसचा प्रवास शहरातील वेगवेगळ्या भागांतून होतो. काही बस कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाने कात्रजवरून स्वारगेटला येतात. त्यानंतर हडपसरवरून सोलापूर, नांदेड, लातूरकडे जातात. तर काही बस गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, वाकडेवाडी, संगमवाडी, नगर रस्त्यावरून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जातात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवाशांना घेण्यासाठी या बस जागोजागी थांबतात. पौड रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर, स्वारगेट चौक, नगर रस्त्यावर या बस थांबत असल्याने वाहतूककोंडी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाहेरगावी जाणाऱ्या खासगी बसना रस्त्याच्या कडेला उभे राहू न देता, शहरातील मोकळ्या जागांवर थांबण्याची परवानगी दिल्यास ही कोंडी टाळता येईल. शहरात विविध ठिकाणी पीएमपीचे डेपो आहेत. तेथे काही वेळेसाठी या बस थांबण्याची परवानगी द्यावी,’ असा हा प्रस्ताव आहे. यासाठी महापालिकेकडून ‘पीएमपी’ प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.