पुणे : र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रात थंडी अवतरली असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याने कमी-अधिक प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात किमान तापमानात मोठी घट झाली असून, उर्वरित महाराष्ट्रातही रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच असल्याने रात्री गारवा जाणवतो आहे.

हेही वाचा >>> अडीच फूट उंची असणाऱ्या अझीमचं ठरलं लग्न! आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्रींनाच देणार लग्नाचं आमंत्रण

महाराष्ट्र आणि देशातूनच र्नैऋत्य मोसमी वारे २३ ऑक्टोबरला माघारी गेले. त्यानंतर लगेचच सर्वच भागांत निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. परिणामी हवेत गारवा निर्माण होऊन थंडी अवतरली. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपल्यानंतर ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिणेकडे पावसाचा दुसरा हंगाम सुरू होत असतो. सध्या ईशान्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिणेकडील बहुतांश भाग व्यापला असून, त्यामुळे या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…”

महाराष्ट्रामध्ये थंडीची स्थिती कायम आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांपेक्षा अधिकची घट झाली असल्याने या विभागात थंडावा अधिक आहे. मुंबईसह कोकण विभाग आणि विदर्भात किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट आहे. गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत होती. मात्र रविवारी पुणे शहरात राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे १३.०, तर १३.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. महाबळेश्वर येथे किमान तापमानाचा पारा १३.८ अंशांवर होता. जळगाव, सातारा, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, गोंदिया आदी भागांतही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली.

देशाच्या दक्षिणेत ईशान्य मोसमी पाऊस

र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा देशातील प्रवास संपल्यानंतर दक्षिणेकडे ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरू होतो. हा हंगाम डिसेंबपर्यंत कायम असतो. सध्या ईशान्य मोसमी वारे दक्षिणेकडे सक्रिय झाले असून, तेथे पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रावर सध्या तरी त्याचा कोणताही परिणाम दिसत नाही. केवळ विदर्भातील काही भागांत ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

More Stories onसर्दीCold
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter in maharashtra cold experiences in west maharashtra marathwada zws
First published on: 31-10-2022 at 03:38 IST