पुणे : कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत तक्रारदार नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. येरवडा भागातील एका महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी सहा लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवडा भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या महिन्यात संपर्क साधला होता.‘ परदेशातून एका कुरिअर कंपनीने पाठविलेले पाकिट विमानतळावर जप्त करण्यात आले आहे. या पाकिटात अमली पदार्थ सापडले असून, कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे पाठवावी लागतील’, अशी भीती चोरट्यांनी महिलेला दाखविली होती. ‘याप्रकरणात अटक हाेण्याची शक्यता असून, तातडीने ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करा,’ असे चोरट्यांनी महिलेला सांगितले होते. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात सहा लाख १५ हजार रुपये जमा केले. महिलेने याबाबत चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तपास करत आहेत.
सक्त वसुली संचालनालय (ईडी),अमली पदार्थ विरोधी पथक (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) अशा यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील अनेकांची फसवणूक केली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची आठ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून चोरट्यांनी शेअर बाजरात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेलोवेळी पैसे पाठविले. मात्र, चोरट्यांनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.
समाजमाध्यमातील ओळख महागात
समाजमाध्यमात अनोळऱखी व्यक्तीबरोबर झालेली ओळख एका महिलेला महागात पडली. सायबर चोरट्यांनी महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून तिची दोन लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रविवार पेठेत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या समाजमाध्यमातील खात्यावर मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने मैत्रीची विनंती स्विकारल्यानंतर चोरट्यांनी परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी केली. परदेशातून भेटवस्तू पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी तिला दाखविले होते. त्यानंतर विमानतळावर सीमाशु्ल्क विभागाने (कस्टम) भेटवस्तू जप्त केल्या आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलाल वस्तू परत मिळवण्यासाठी तातडीने बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले होते. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक नामवडे तपास करत आहेत.
