पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या नावाने आलेली वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन सायबर चोरट्यांनी एका महिलेला पाठविले. बनावट चलन ‘एपीके फाईल‘मध्ये होते. ही फाईल उघडताच महिलेचा मोबाइल हॅक करून सायबर चोरट्यांनी बँक खात्यातून सात लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३३ वर्षीय महिला आंबेगावमधील जांभूळवाडी रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत.
सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या महिन्यात २१ मे रोजी ‘एपीके फाईल’ पाठविली होती. या फाईलवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ट्रॅफिक चलन असा उल्लेख होता. महिलेने वाहतूक नियमभंगाचे चलनाची फाइल आल्याने त्वरित उघडली. फाईल उघडताच महिलेचा मोबाइल हॅक झाला आणि चोरट्यांनी मोबाइलचा ताबा घेतला. महिलेचे समाजमाध्यमातील खाते निष्क्रिय झाले. मोबाइलचा ताबा घेतल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली.
बँक खात्यास मोबाइल क्रमांक जोडला असल्याने चोरट्यांकडे सर्व माहिती पोहोचली होती. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून सात लाख रुपयांची रोकड स्वत:च्या खात्यात वळविली, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले यांनी दिली. खात्यातून पैसे लंपास झाल्यानंतर महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक चोरमोले तपास करत आहेत.
एपीके फाईल उघडताच फसवणूक
सायबर चोरट्यांकडून एपीके फाईल पाठवून फसवणूक करण्यात येते. यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. शक्यतो नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या एपीके फाईल उघडू नयेत. अशा प्रकारच्या फाइलच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोमवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी सांगितल्यानुसार तक्रारदारांनी खात्यात रक्कम जमा केली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्यानंतर त्यानंतर गेल्या महिनाभरात तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १९ लाख रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.