पुणे : गॅसपुरवठा खंडित करण्याच्या बतावणीने एका महिलेची सायबर चोरट्यांनी सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. या भागात एका खासगी कंपनीकडून गॅस पुरवठा करण्यात येतो. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर जून महिन्यात संपर्क साधला. गॅसचे देयक थकीत आहे. देयक न भरल्यास गॅस पुुरवठा खंडित करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली.
चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. ऑनलाइन पद्धतीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून सात लाख रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत. यापूर्वी गॅस पुरवठा खंडित करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत.