पुणे : विमानात ठेवलेल्या पर्समधून महिलेचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमान प्रवाशाच्या सामानातून ऐवज चोरीला गेल्याची अन्य एक घटना पंधरा दिवसांपूर्वीच घडली होती.

याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या दिल्लीच्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २२ मे रोजी दिल्लीहून पुण्याकडे विमानाने येत होत्या. विमान प्रवासात त्यांच्याकडील पिशवीतून पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच १३ हजार ५०० रुपये असा ऐवज चोरून नेण्यात आला. तक्रारदार महिला पहाटे विमानातून उतरल्यानंतर पर्समधून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.