पुणे मैत्रिणीने ‘चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावून मित्राच्या डोळ्यात मिरची टाकून जखमी केले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्याचे हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या चार तासात कोंढवा पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. याप्रकरणी मैत्रीण, तिचा पती आणि अन्य दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

सोनल ऊर्फ सोनी अतुल रायकर (वय ३५, रा. कोंढवा खुर्द), तिचा पती अतुल दिनकर रायकर (वय ३८), तसेच त्याचे साथीदार रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द), सुरेश ऊर्फ सुशांत कुमार सुरवाती हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल आणि फिर्यादी हे मित्र आहेत. सोनलने बुधवारी मित्राला चहा पिण्याच्या बहाण्याने एनआयबीएम रस्ता परिसरातील घरी बोलविले. सायंकाळी ते मैत्रिणीच्या घरी गेले. घरात प्रवेश करताच सोनलने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जखमी केले. त्याचवेळी घराबाहेर दबा धरून बसलेल्या तिच्या पतीसह इतर दोन साथीदारांनी आत येऊन त्याला मारहाण केली, तोंडात बोळा कोंबला, हातपाय दोरीने बांधले आणि खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी तरुणाचा मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. त्याच्या मोबाइलवरून पत्नीला संदेश पाठवून दागिने आणि पैसे तयार ठेवण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना मिळाली. तत्काळ वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांना याबाबतची माहिती देऊन सहायक निरीक्षक सुकेशनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह पथकाने एनआयबीएम रस्ता भागातील घरावर छापा टाकून व्यक्तिची सुटका केली. कोंढवा पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.