पुणे : नवरात्रीच्या काळात संपूर्ण देशात दुर्गेची पूजा केली जाते. स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो. परंतु याच काळात पुण्यातील सहा महिला आयटी कर्मचारी स्वतःचा सन्मान व हक्कासाठी पोलीस ठाण्यांपासून कामगार कार्यालयापर्यंत दारोदार फिरत आहेत.

सदाशिव पेठेतील एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीच्या विरुद्ध या महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. या आयटी कंपनीचा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा दूरध्वनीवर व कार्यालयीन बैठकांमध्ये अपमान केल्याचे, तसेच कर्मचारी स्वतःहून राजीनामा दिल्यानंतरही आवश्यक रिलीव्हिंग लेटर नाकारल्याचे आरोप आहेत. एवढेच नव्हे, तर कागदपत्रे देण्यासाठी संबंधित महिला कर्मचाऱ्यांना माफी मागावी, अशी अट जबरदस्तीने घालण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत आयटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कामगार कार्यालय खरोखरच सक्षम आहे का, महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर शासन व प्रशासन ठोस कारवाई करणार का, रोजगारीसाठी आयटी क्षेत्रात जाणाऱ्या महिलांना सुरक्षित, सन्मानजनक वातावरण कधी मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या महिला कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेक सरकारी कार्यालयांचे दरवाजे ठोठावले आहेत. तरीदेखील आजपर्यंत योग्य तो निकाल मिळालेला नाही. नवरात्रीत देवीच्या प्रतिमेला फुले वाहिली जातात, शक्तीचे स्तवन केले जाते. पण दुसरीकडे, खऱ्या आयुष्यातील या महिला कर्मचाऱ्यांना स्वतःच्या भविष्याचा आणि सन्मानाचा हक्क मिळवण्यासाठी न्यायालय, शासकीय कार्यालये व पोलीस ठाण्यांचे फेरे मारावे लागत आहेत. स्त्रीशक्तीची पूजा करणारा समाज, प्रत्यक्ष जीवनात महिलांचे रक्षण करेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

फोरम फोर आयटी एम्प्लॉईजने संघटनेने या प्रकरणाकडे मुख्यमंत्री कार्यालयासह इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. फोरमने याबाबत समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यात या महिला कर्मचाऱ्यांची व्यथा मांडण्यात आली असून, त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग यासह इतर शासकीय यंत्रांकडे करण्यात आली आहे.

न्यायासाठी दाद

विश्रामबाग पोलीस ठाणे – औपचारिक तक्रार नोंद

कामगार कार्यालय – कामगार हक्कांबाबतची मागणी

महिला आयोग – महिला म्हणून झालेल्या मानसिक छळाविरोधात तक्रार