पुणे : हडपसर, तसेच अरण्येश्वर भागातील वाळवेकरनगर परिसरात चोरट्यांनी पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेले. हडपसर भागातील एका मंगल कार्यालयासमोर रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (३१ मे) घडली. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मांजरीतील कलाश्री बॅक्वेंट हाॅलसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.

अरण्येश्वर भागातील वाळवेकरनगर परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ३० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी (१ मे) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाळवेकरनगर भागात राहायला आहेत. रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्या पतीसोबत निघाल्या होत्या. अनिलकुंज बंगल्यासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लंपास

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दागिने, रोकड आणि मोबाइल संच असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आंबेगाव परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी दुपारी एकच्या सुमारास स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात एका बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्या वेळी बसमध्ये गर्दी होती. चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दागिने, मोबाइल संच, रोकड चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील दीड लाखांची सोन्याची बांगडी चोरल्याची घटना स्वारगेट परिसरात नुकतीच घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा प्रकारचे गुन्हे करणारे चोरटे परराज्यातील किंवा परगावचे असल्याचा संशय आहे. चोरट्यांना पकडण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकांना देण्यात आल्या आहेत. चोरट्यांच्या मागावर पोलिसांची पथके आहेत. निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा