पुणे: तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेकडून गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाचा परिणाम पुणे विभागात दिसून आला. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज त्यामुळे ठप्प झाले. दरम्यान, भूमी अभिलेख राजपत्रित संघटनेच्या वतीने या संपाला पाठिंबा देण्यात आला आहे.
‘भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्यासाठी तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक वर्षापूर्वी अहवाल दिला होता. मात्र, त्यानंतरही त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, राज्य सरकारच्या निषेधार्थ भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनास राज्यातील भूमी अभिलेखाच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे,’ अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.
‘भूमी अभिलेख खात्यामधील कर्मचाऱ्यांच्या सेवा भरती नियमात सरकारने २०१२ मध्ये दुरुस्ती करून सर्व पदांसाठी तांत्रिक अर्हता निश्चित केली आहे. संबंधित खात्यामधील सर्व पदांसाठी बीई सिव्हिल पदवी आणि पदविका अशी अट लागू केली आहे. या पदासाठी कारकून संवर्गातील वेतन दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. सन २०१४ मध्ये संघटनेने केलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना अनेक वेळा आंदोलन करून अजूनही वेतन मिळालेले नाही,’ असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.