‘पुम्टा’च्या बैठकीत वाहतुकीचे नियोजन; विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार वाहनांसाठी बंद

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअर या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम येत्या आठवडाभरात सुरू केले जाणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार वाहनांसाठी बंद केले जाणार आहे. तसेच या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) छोटय़ा बस गाडय़ा सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.    

पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत या उड्डाण पुलाबाबत नियोजन करण्यात आले. बैठकीत उड्डाण पुलाचे काम आठवडाभरात सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. काम सुरू केल्यानंतर या मार्गात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी बंद करणे, या मार्गात पीएमपीच्या छोटय़ा बस गाडय़ा सोडणे आणि जास्तीत जास्त

वाहतूक  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविणे हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, या उड्डाण पुलाचे काम आठवडाभरात सुरू केले जाणार आहे. या मार्गावरून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग बंद करण्याचे ठरवण्यात आले आहे. दिवसभरात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून २५० पेक्षा जास्त वाहने जात असतात. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक थांबवण्यात येते. दोन्ही बाजूंकडून दररोज १५ हजारपेक्षा जास्त वाहने ये-जा करतात. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित वाहने ही चतु:श्रुंगी पोलीस चौकीजवळील मार्गाने विद्यापीठाकडे जाऊ शकणार आहेत.

 उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर या मार्गावर जास्त वाहने येऊ नयेत, यासाठी पीएमपीच्या छोटय़ा बस गाडय़ा सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे. या मार्गावरून येणारी वाहने ही जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत, असेही आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महापालिका, वाहतूक विभाग, पीएमपी, पीएमआरडीए आणि नागरिक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. वाहतूक सर्वासाठी सोयीस्कर होईल, असे नियोजन असणार आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले.     

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त  सुहास दिवसे, वाहतूक विभागाचे उपआयुक्त राहुल श्रीरामे, विवेक खरवडकर, व्ही. जी. कुलकर्णी आणि टाटा कंपनीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.