अविनाश कवठेकर

पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयाला देण्याचा खटाटोप महापालिकेत सुरू झाला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून २४ लाख ९९ हजारांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, अन्य ठेकेदारांना निविदा भरू नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाची ही निविदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, स्वच्छतागृहातील पायाभूत सुविधांचा अभावामुळे महापालिकेच्या नियोजनावर टीका झाली होती. त्यामुळे ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संस्था आणि संघटनांकडून होत असतानाचा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुढील वर्षीच्या गणेशोत्सवात स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) निविदा काढण्यात आली असून, ती भरण्याची अंतिम मुदत शनिवार (१४ ऑक्टोबर) असून, एका ठेकेदारासाठी निविदेच्या अटी-शर्तीही बदलण्यात आल्याची आणि हा ठेकेदार अजित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचीही चर्चा महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात आहे.

आणखी वाचा-पालकमंत्र्यांकडून ससूनच्या अधिष्ठात्यांची कानउघाडणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागप्रमुखांना २५ लाख रुपयांपर्यंतच्या निविदा मंजुरीचे अधिकार असल्याने ही निविदा २४ लाख ९९ हजार २०० रुपयांची काढण्यात आल्याने ती अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडेही मंजुरीसाठी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्याकडे विचारणा केली असता यासंदर्भात चौकशी करून अभियंत्यांकडून खुलासा मागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.