पुणे : पुण्यातील कार्यालयीन जागांच्या मागणीत यंदा जानेवारी ते मार्च या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत एकूण २० लाख चौरस फूट कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ५९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेण्यात बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. कुशमन अँड वेकफिल्ड संस्थेने पुण्यातील कार्यालयीन जागेचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यात पहिल्या तिमाहीत निव्वळ २०.७ लाख चौरस फूट कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात २१ टक्के, तर मागील वर्षीच्या तुलनेत ५९ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
कार्यालयीन जागा सहकार्यासाठी जागेला सर्वाधिक मागणी आहे. याचबरोबर बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांकडून कार्यालयीन जागा भाड्याने घेण्याचे प्रमाण अधिक आहे. देशातील कार्यालयीन जागा व्यवहारात पुण्याचा वाटा १५ टक्के आहे. देशात निव्वळ कार्यालयीन जागा व्यवहार दिल्लीत ३१ लाख चौरस फूट, मुंबईत २९ लाख चौरस फूट, बंगळुरूत २५ लाख चौरस फूट असून, त्यानंतर पुण्याचे स्थान आहे.
पहिल्या तिमाहीत पुण्यातील एकूण भाडेतत्त्वावरील एकूण कार्यालयीन जागा ३५ लाख चौरस फुटांवर पोहोचल्या आहेत. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत १०० टक्के, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २०० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एकूण कार्यालयीन जागा व्यवहारांमध्ये नवीन भाडेकरारांबरोबर सध्याच्या भाडेकराराच्या नूतनीकरणाचा समावेश होतो. एकूण कार्यालयीन जागा व्यवहारांमध्ये पुण्याचा वाटा १७ टक्के आहे.
जागतिक सुविधा केंद्राकडून मागणी जास्त
भाडेकरारातील ही वाढ जागतिक सुविधा केंद्रामुळे झाली आहे. प्रामुख्याने बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील केंद्राकडून मागणी दिसून आली. पहिल्या तिमाहीत केवळ जागतिक सुविधा केंद्र कंपन्यांनी १२ लाख चौरस फूट जागेचा वापर केला. देशातील एकूण जागतिक सुविधा केंद्रांच्या जागा वापरात पुण्याचा वाटा सुमारे २० टक्के आहे. पुण्यातील कार्यालयीन जागा व्यवहारात कार्यालयीन जागा सहकार्याचे प्रमाण २७ टक्के आहे.
जागतिक पातळीवरील कंपन्यांसाठी एक प्रमुख धोरणात्मक केंद्र म्हणून पुणे वेगाने पुढे येत आहे. ते फक्त किफायतशीर स्थान राहिलेले नाही, तर नावीन्य, वित्त आणि परिवर्तनासाठीचे एक धोरणात्मक केंद्र बनले आहे. जागतिक सुविधा केंद्रांना चालना देण्यासाठी कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा असा सुयोग्य मेळ पुण्यात आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.मोईनुद्दीन पटेल, व्यवस्थापकीय संचालक, कुशमन अँड वेकफिल्ड (पुणे)