पुणे : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रस्तावित आराखड्यानुसार जागतिक स्तरावरील ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या (यूसीआय) १५ जणांच्या पथकाकडून येत्या गुरुवारी (१० जुलै) स्पर्धेच्या मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहभागी सायकलपटूंना लाॅस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.
जिल्ह्याचा पर्यटन आराखडा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यानुसार या आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी केले. त्या वेळी त्यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. पर्यटनाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ही स्पर्धा चार टप्प्यांमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या स्पर्धेमुळे पुण्याला प्रमुख पर्यटन स्थळ, जागतिक क्रीडा केंद्र म्हणून जागतिक पातळीवर मान्यता मिळेल. पुण्यात सायकल चालविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या स्पर्धेत किमान ५० देशांतील सायकलपटूंचा सहभाग अपेक्षित आहे,’ असे डुडी यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘ही स्पर्धा ६८९ किलोमीटर अंतराच्या परिसरात होणार आहे. बालेवाडीपासून या स्पर्धेला प्रारंभ होईल. त्या दृष्टीने जिल्ह्यातील ७०० किलोमीटर अंतराचा विकास होणार आहे. स्पर्धेच्या दृष्टीने ७०० किलोमीटर अंतराचा परिसर ‘झीरो वेस्ट काॅरिडाॅर’ म्हणून विकसित केला जाईल. स्पर्धेसाठी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण केली जातील.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या असून, पावसाळा संपल्यानंतर दोन महिन्यांत कामे करण्यात येतील. या स्पर्धेचे थेट प्रेक्षपणही भारतासह काही देशांत केले जाणार असून, किमान दहा हजार स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.’
या स्पर्धेच्या आयोजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) स्पर्धेचा खर्च करण्यात येईल. दर वर्षी ही स्पर्धा होणार असून, पर्यटनासह अन्य क्षेत्राला आर्थिक चालना यामुळे मिळेल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी