पुणे : जागतिक कीर्तीच्या हवामानशास्त्रज्ञ प्रा. सुलोचना माधव गाडगीळ (वय ८१) यांचे बंगळुरू येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि मुलगा प्रा. सिद्धार्थ गाडगीळ असा परिवार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या त्या स्नुषा होत.
हार्वर्ड विद्यापीठातून पीएच. डी. संपादन करून सुलोचना गाडगीळ १९७१ मध्ये मायदेशी परतल्या. बंगळुरू येथील ‘आयआयएससी’ मध्ये सेंटर फॉर एटमॉस्फेरिक अँड ओशनिक सायन्सेस (सीएओएस) या संस्थेच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. तेथूनच त्या प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. इंडियन क्लायमेट रिसर्च प्रोग्रॅमच्या आयोजनात त्यांचा मोठा वाटा होता. अनेक आंतरराष्ट्रीय बैठकींत त्यांनी भारताचे प्रतिनिधत्व केले.
मोसमी पावसाच्या उत्क्रांतीच्या घटनांचे मॉडेलिंग करून मोसमी पाऊस कसा आणि का आहे याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या संशोधनामुळे मोसमी पावसाच्या ढगांच्या पट्ट्यांच्या उप-हंगामी प्रवासाचे रहस्य उलगडले गेले. शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी भारतातील विविध प्रदेशांतील पर्जन्यमानाच्या बदलानुसार शेतीचे नियोजन आखले होते.