महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या बलिदान दिनानिमित्त पुण्यात शनिवारी (२० ऑगस्ट) विवेक निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. यावेळी गोडबोले यांनी संघटित धर्म हा विज्ञान विरोधी आहे, असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी करताना अच्युत गोडबोले म्हणाले की, प्रत्येक गोष्टीबद्दल शंका निर्माण केली पाहिजे. धर्म आणि विज्ञान यांचा लढा फार वर्षापासूनचा आहे. संघटित धर्म हा विज्ञान विरोधी आहे. निसर्ग हाच देव आहे आणि माणुसकी हा प्रत्येकाचा धर्म असावा. संघटित धर्माने मानवाचे प्रचंड नुकसान केलेले आहे.

“भारतीय राज्यघटनेची चौकट हलवू नये यासाठी लढा दिला पाहिजे”

डॉ. बाबा आढाव म्हणाले, “भारतीय राज्यघटनेची चौकट हलवू नये यासाठी लढा दिला पाहिजे. मानवी मूल्यांची प्रतिष्ठा वाढवणे आणि कलात्मक सर्जनशीलता आणि चिंतनशीलता आवश्यक आहे. क्षमता वाढलेली असताना घटना आणि संधीची समानता कशी मिळणार यावर प्रबोधन करत समाजाबरोबर संवाद वाढवणे आवश्यक आहे.”

“मानवी भावनांना साद घालणं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महत्त्वाचं”

अविनाश पाटील म्हणाले, “मानवी भावनांना साद घालणं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महत्त्वाचं आहे. कामाच्या त्रिसूत्रीपासून पंचसूत्रीपर्यंतचा अंनिसचा प्रवास उल्लेखनीय आहे. राजकीय अंधश्रद्धांबद्दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं आवश्यक आहे. संघटनेचे सकारात्मक उपद्रव मूल्य वाढले पाहिजे.”

“अमृत महोत्सव करताना संविधान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत”

“अजूनही कामाचा व्याप विस्तारण्याची गरज आहे. जबाबदारीचे धोरण आणि भान येण्याची गरज आहे. भारतीय संविधान हे अधिष्ठान घेऊन संविधानाचा अमृत महोत्सव करताना संविधान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“अंधश्रद्धा निर्मूलन हे आपलं काम आहे, पण ते आपलं अंतिम उद्दिष्ट नाही”

सुभाष वारे म्हणाले, “दाभोलकरांच्या खुनानंतर संघटनेची वाटचाल कौतुकास्पद आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हे आपलं काम आहे, पण ते आपलं अंतिम उद्दिष्ट नाही. आनंदी समाज निर्मितीमधील अडथळे दूर करणे हे आपलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे व्यापक अंगाने चळवळ वाढवावी लागेल.”

हेही वाचा : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ९ वर्षे, मारेकऱ्यांना शिक्षेची मागणी करत अंनिसकडून इंचलकरंजीत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’

यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे, वचन साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य पदाधिकारी संजय बनसोडे, विशाल विमल उपस्थित होते. अनिल करवीर, अतुल सवाखंडे यांनी गाणी सादर केली. संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. विशाल विमल यांनी सूत्रसंचलन केले. रेश्मा खाडे, विनोद खरटमोल, शीतल वसावे, अरविंद शिंदे, पी. एम. जाधव, प्रदीप हिवाळे, राजेश देवरुखकर यांनी निर्धार व्यक्त केले. रंजना गवांदे यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्भय मॉर्निंग वॉक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या याच्या नवव्या बलिदान दिनानिमित्त दाभोलकरांचा खून करण्यात आला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून एस. एम. जोशी सभागृहापर्यंत निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावांसह वचन साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टन आणि समविचारी संस्था संघटनांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.