पुणे : घरासमोर पाणी सांडल्याने झालेल्या वादातून एकाला गजाने बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या महापालिका वसाहतीत ही घटना घडली. मुकेश धोबी (वय ३४, रा. म्हसोबा मंदिरासमोर, पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर खांडेकर, भिकाजी खांडेकर, मुस्कान खांडेकर (तिघे रा. पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी), तसेच अली इराणी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धोबी याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोबी आणि खांडेकर कुटुंबीय शेजारी आहेत. घरासमोर पाणी सांडल्याने त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (८ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास मुकेश धोबी हा कामानिमित्त घराबाहेर पडला. त्या वेळी खांडेकर आणि इराणी याने त्याला शिवीगाळ केली. त्यांच्यात वादावादी झाली. खांडेकर यांनी धोबीच्या डोक्यात गज मारला, तसेच त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या धोबी यांची पत्नी, भाऊ, आई, वडील आणि भावजय यांनाही आरोपी खांडेकर, इराणी यांनी गजाने मारहाण केली. त्यांना वीट फेकून मारली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
पर्वती भागात दोघांवर शस्त्राने वार
पर्वती भागात वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांवर टोळक्याकडून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. टोळक्याने परिसरात दहशत माजविली. दांडेकर पूल परिसरातील मांगीरबाबा चौकात ७ जुलै रोजी आदित्य वाघमारे (वय १८, रा. सिंहगड रस्ता) याच्यावर टोळक्याने हल्ला केला. त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली, टोळक्याने त्याला गजही फेकून मारला. याप्रकरणी यश मेरवाडे, सौरभ साठे, प्रतीक जाधव आणि मनोज भोसले (सर्व रा. दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. टोळक्याने दांडेकर पूल परिसरात दहशत माजविली. सहकारनगर भागात ८ जुलै रोजी टोळक्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास अल्पवयीनावर टोळक्याने कोयत्याने वार केले. या घटनेत अल्पवयीन मुलगा जखमी झाला. अल्पवयीनावर हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तळजाई वसाहत भागात राहायला आहे. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.