पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पूर्वी कंत्राटी कामगार म्हणून कामाला असलेल्या एका तरुणाने म्हाडात सदनिका मिळवून देण्याच्या बहाण्याने ६०० लोकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रतीक राजेश धाईंजे (वय २५, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक याचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाठीपुरवठा विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. माझी महापालिकेत ओळख आहे. म्हाडात सदनिका मिळवून देतो, असे त्याने नागरिकांना सांगितले. म्हाडाच्या अर्जाच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार रुपये घेतले. तसेच म्हाडाचे घर लागल्यानंतर प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे नागरिकांकडून मान्य करून घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६०० लोकांनी प्रतीककडे अर्जासाठी पैसे दिले. त्याने म्हाडाचे बनावट ‘लेटरहेड’ तयार केले. त्यावर म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करून काही नागरिकांना दिले. तसेच म्हाडाची लॉटरी निघणार, यादी येणार, तुमचे नाव नक्की घेतले आहे, अशी कारणे सांगून लोकांना पुढची तारीख देऊन चालढकल केली. अशा प्रकारे फसवणूक होत असल्याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रतीक याला शोधून अटक केली. म्हाडाचे घर देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन नागरिकांची फसवणूक केल्याचे त्याने मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.