पुणे: दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या मोठ्या भावाचा खून करणाऱ्या तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा आरोपीला भाेगावी लागणार आहे. या खटल्यात फिर्यादी आई फितूर झाली. आई फितूर झाल्यानंतर परिस्थितीजन्य पुरावे, ग्राह्य धरुन न्यायालायने आरोपीला शिक्षा सुनावली.
नीलेश बबन बोरकर (वय ३१, रा. कोंडे वस्ती, ऊरळी देवाची) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने भाऊ मंगेश याचा खून केला होता. याबाबत रत्नमाला बबन बाेरकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार ललिता कानवडे यांनी सहाय केले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी असलेल्या आरोपीच्या पत्नीचा साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेनंतर आरोपी नीलेशच्या पत्नीच्या ठावठिकाणा लागला नव्हता.
हवालदार कानवडे यांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर न्यायालयत तिची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात तिची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी नीलेशचा मंगेश मोठा भाऊ होता. तो हडपसर भागातील काळेपडळ येथे राहत होता. १९ जानेवारी २०२० रोजी तो ऊरळी देवाची येथे आला होता.
मंगेश कामधंदा करत नव्हता. तो दारू पिऊन आईला त्रास देत होता. नीलेशने मंगेशला समजावून सांगितले होते. नीलेश आणि मंगेश यांच्यात वाद झाला. त्या वेळी नीलेशने दगडी पाटा मंगेशच्या डोक्यात घातला होता. या घटनेत त्याचाा मृत्यू झाला होता.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी करुन न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल केले होते. हवालदार कानवडे, सहायक निरीक्षक लोखंडे यांनी न्यायालयीन प्रक्रियेत सहाय करुन योग्यरित्या तपास केल्याने परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस मंजूर केले. गेल्या सहा महिन्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे.