पिंपळे निलख परिसरात संगणक अभियंता तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तिने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या तरुणीचे वडील निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत.
तपस्या ओमप्रकाश भास्कर (वय ३० सध्या रा. जगताप चौक, पिंपळे निलख, मूळ रा. जयपूर, राजस्थान ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती गेली आठ वर्षे पर्सिस्टंट सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होती. सध्या ती भाडेतत्त्वावर राहायला होती. रविवारी घरमालक तिच्याकडे भाडे घ्यायला गेले. तेव्हा सदनिकेचा दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. घरमालकांनी वाकड पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा तपस्या ही बेशुध्दावस्थेत पडली होती. तिला रुग्णालयात नेले. उपचारांपूर्वी ती मरण पावली होती. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी सापडली आहे. कौटुंबिक कलहातून आपण आत्महत्या करत असल्याचे तपस्या हिने चिठ्ठीत नमूद केले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून कीटकनाशकाची बाटली, झुरळ मारण्याचा स्प्रे व चिठ्ठी जप्त केली आहे. शवविच्छेदन करण्यात आले असून तिचा मृतदेह आई-वडिलांनी ताब्यात घेतला आहे, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. जे शेख यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2015 रोजी प्रकाशित
पिंपळे निलखमध्ये संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या
पिंपळे निलख परिसरात संगणक अभियंता तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
Written by दया ठोंबरे
First published on: 15-12-2015 at 03:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young woman computer engineer suicide