पुणे : पुणे महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. एकता भरत पटेल (वय २३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक त्र्यंबक शेरखाने (वय ३८, रा. औंध) याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता लोहगावमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीस्वार एकता विश्रांतवाडीतून येरवडा कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाली हाेती. काॅमर झोन कंपनीजवळ महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीस्वार एकताला धडक दिली. चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालक शेरखाने याला ताब्यात घेण्यात आले.

महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत यापूर्वीही दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश अपघात डंपरचालकांच्या चुकांमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकताचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. रुग्णालयाच्या आवारात एकताच्या मित्र-मैत्रिणींनी गर्दी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात जणांचा अपघाती मृत्यू

शहर परिसरात गेल्या आठवडाभरात गंभीर स्वरूपाच्या अपघातांत वाढ झाली आहे. आठवडभरात वेगवेगळ्या अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यात तीन लहान मुलांचा समावेश आहे.