पिंपरी : रिक्षाला धक्का (कट) मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार केले. ‘मी येथील भाई आहे, माझ्यावर दोन हाफमर्डरच्या केस चालू आहेत’ असे बोलून दहशत निर्माण केली. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी विशाल सुरेश शिंदे (२५, मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विश्वंबर गायकवाड (३१, अजंठानगर, चिंचवड) आणि दिगंबर विश्वंबर गायकवाड (३५, अजंठानगर, चिंचवड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्यावर त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत असताना आरोपी आकाश याने रिक्षाने फिर्यादीला कट मारला. फिर्यादीने याचा जाब विचारला असता, त्याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वार केले. दिगंबर याने हातातील कोयता हवेत फिरवून ‘मी येथील भाई आहे, माझ्यावर दोन हाफमर्डरच्या केस चालू आहेत. माझ्या मध्ये कोणीही आले तर मी त्यास सोडणार नाही’ असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
मोटार गहाण ठेवून फसवणूक
विश्वास संपादन करून एका व्यक्तीच्या मालकीची मोटार आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मोटार दोन लाख रुपयांना गहाण ठेवून आर्थिक फसवणूक केली. मोटार परत मागितली असता शिवीगाळ करत दमदाटी केली. ही घटना बावधनमध्ये घडली. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास मिळवून त्यांची मोटार, आरसी बुक, आधारकार्ड व पॅनकार्डचे झेरॉक्स विश्वासाने घेतले. मोटार दोन लाख रुपयांसाठी गहाण ठेवून आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीने मोटार परत करण्याची विनंती केली असता त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याला मारहाण
पाणीपुरीचा ठेला लावण्याच्या कारणावरून पुतण्या आणि जावई यांच्यात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या चुलत्याला पुतण्याने मारहाण केली. या मारहाणीत चुलत्याचा वरच्या जबड्याचा पुढचा दात पडला असून ते जखमी झाले आहेत. ही घटना पठारे वस्ती, भोसे येथे घडली.
या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरगुती सामान घेण्यासाठी जात असताना पठारे वस्ती येथे त्यांचा पुतण्या आणि जावयाचा भाऊ यांचा पाणीपुरी ठेला लावण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. फिर्यादी त्यांचा वाद मिटवण्यासाठी गेले आणि आरोपीला भांडणे करू नको असे म्हणून मागे ओढले. यावर आरोपी रागावला आणि त्याने फिर्यादीच्या कानाखाली मारून तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे फिर्यादीचा वरच्या जबड्याचा पुढचा दात पडला आणि तोंडातून रक्त येऊ लागले. तसेच आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून ‘मारून टाकण्याची’ धमकी दिली. चाकण पोलीस तपास करत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर दोन अपघात, एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
पुणे-नाशिक महामार्गावर दोन अपघात झाले. चाकण येथील अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी येथील अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.सागर मच्छिन्द्र काशीद (२९, खरबुडी बुद्रुक, खेड) असे चाकण येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हे त्यांच्या दुचाकीवरून हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून पुन्हा दुचाकीवरून घरी जात असताना पुणे-नाशिक महामार्गावर वाकी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञाताने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
महामार्गावरील दुसरा अपघात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे झाला. आकाश बबन सुधारे (३३) हे कामावर जाण्यासाठी पायी रस्ता ओलांडत असताना नाशिक-पुणे बसने त्यांना धडक दिली. या अपघातात आकाश सुधारे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आकाश यांच्या वडिलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
अडीच लाखांचा गांजा जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन लाख ४२ हजार रुपयांचा गांजा जप्त केला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पहिली कारवाई मंगळवारी (४ नोव्हेंबर) रात्री यमुनानगर, निगडी येथे करण्यात आली. या कारवाई मध्ये पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या ताब्यातून दोन लाख ३० हजार ४५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत. दुसरी कारवाई ताथवडे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ११ हजार ७५० रुपये किमतीचा २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई कातवी पुलाज जवळ, मावळ येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत पवार यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश गणपत शिंदे (२९, नागाथली, वडेश्वर, ता. मावळ) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने विनापरवाना व बेकायदेशीररित्या ४० हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस जवळ बाळगले. पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
