पुणे : हातबाॅम्बची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी दोन महिन्यांचा साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विकी अशोक सावंत (वय २४, रा. शिवकृपा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. वाकड पाेलिसांचे पथक वाकड भागात ९ सप्टेंबर २०१५ रोजी गस्त घालत होते. त्या वेळी सावंत हा थोपटे लाॅन परिसरात थांबला होता. तो हातबाँम्ब विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा रुमालात हातबाँम्ब ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर बाॅम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) घटनास्थळी पाचारण करण्यात आली.
बीडीडीएसच्या पथकाने सावंतकडून बाँम्ब ताब्यात घेतला. तेव्हा गावठी बनावटीचा हातबाँम्ब जिवंत असल्याचे तपासणीत आढळून आले. याबाबतचा अहवाल पोलिसांकडे देण्यात आला.
सावंत याच्याविरुद्ध बेकायदा हातबाँम्ब बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तत्कालिन पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून या खटल्यात नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तपास अधिकारी, तसेच बाॅम्बशोधक नाशक पथकातील अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन सावंत याला दोन महिने साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.