उन्हातून जाताना कायम आपल्याबरोबर राहणारी सावली शुक्रवारी मात्र नाहीशी होणार आहे! स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी बरोबर बारा वाजता उन्हात उभे राहिल्यास प्रत्येकाला सावलीच पडत नसल्याचा मजेदार अनुभव घेता येईल.
‘न पडणाऱ्या’ सावलीचे निरीक्षण करण्याची तसेच दुर्बिणीतून सौर डागांचे निरीक्षण करण्याची संधी टिळक स्मारक मंदिराच्या आवारात दुपारी १२ ते १ या वेळात उपलब्ध आहे. ‘ज्योतिर्विद्या परिसंस्था’ या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून तो सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. संस्थेचे सचिव डॉ. सागर गोखले यांनी माहिती दिली. सूर्य डोक्यावर येतो तेव्हाच सावली पायाखाली पडते म्हणजेच सावली पडलेली दिसतच नाही. उत्तरायण व दक्षिणायनामुळे सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या २३.५ अंश उत्तरेला व दक्षिणाला प्रवास करतो. त्यामुळे २१ मार्च व २३ सप्टेंबर रोजी ज्या वेळी सूर्य खगोलीय विषुववृत्त पार करत असतो, तेव्हा पृथ्वीवरील विषुववृत्तावर स्थानिक वेळेनुसार १२ वाजता सूर्य बरोबर डोक्यावर (ख-मध्य बिंदू) येतो. पुण्याचे अक्षांश १८.५ अंश आहे. सूर्य उत्तरेला प्रवास करत असताना १३ मे रोजी ‘ख-मध्य बिंदू’ पार करणार आहे. त्यामुळे या दिवशी बारा वाजता सावली दिसेनाशी होणार आहे.